ताज्या बातम्या

‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी भाजयुमोचे आंदोलन; मुंबईतील सहाही जिल्ह्यांत सामूहिक गायन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ सुरू असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रगीताच्या सन्मानाला ठेच पोहोचविल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), मुंबईच्या वतीने रविवारी मुंबईतील सहाही जिल्ह्यांत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
दादर पूर्व येथील श्री स्वामीनारायण मंदिरासमोरही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम्’चे गायन करून राष्ट्रगीताच्या सन्मानाचे आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा संकल्प केला. काँग्रेस नेत्यांच्या कथित अनादराच्या विरोधात लोकशाही मार्गाने निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह म्हणाले, “मोदीविरोध करता करता काँग्रेस आता देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांचाही विरोध करण्याच्या मानसिकतेत उतरली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा केलेला कथित अनादर हा कोट्यवधी भारतीयांच्या राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे. या घटनेतून काँग्रेसचे खरे स्वरूप देशासमोर आले आहे.”
ते पुढे म्हणाले, “‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली. हे गीत गाताना अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सत्तेचा लाठीमार आणि तुरुंगवास सहन केला; मात्र त्यांनी राष्ट्रभक्तीची भावना सोडली नाही. त्यामुळे राष्ट्राच्या गौरवाशी संबंधित प्रतीकांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
“राजकीय विरोधालाही एक मर्यादा असते. राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय भावना आणि देशाच्या गौरवाशी खेळ करणे जनता कदापि स्वीकारणार नाही. ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी भाजयुमो मुंबई सदैव ठामपणे उभे राहील,” असेही सिंह यांनी सांगितले.
या आंदोलनात भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Scroll to Top