कराड : विंग तालुका कराड येथील विंग स्टँडजवळ रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. साचलेल्या पाण्यात गवत व झाडाझुडपांची वाढ झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
विंग स्टँड परिसरात प्रवाशांची तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यालगत साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याचे चित्र दिसून येत आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून, डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
सांडपाणी दीर्घकाळ साचून राहिल्याने परिसरातील नागरिक, प्रवासी तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या समस्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
संबंधित प्रशासनाने तातडीने साचलेले सांडपाणी काढावे, परिसरातील गवत व झाडाझुडपे हटवून स्वच्छता करावी आणि भविष्यात पुन्हा सांडपाणी साचणार नाही, यासाठी कायमस्वरूपी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विकासाच्या गप्पांपेक्षा नागरिकांच्या आरोग्यासाठी मूलभूत स्वच्छता आणि पाण्याचा योग्य निचरा कधी होणार? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




