ताज्या बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व सुरक्षा नियोजनाचा आढावा; मुंबईत समन्वय बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : आगामी श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्था, सुरक्षा नियोजन आणि विविध सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) परळ येथील उपआयुक्त (परिमंडळ-२) यांच्या कार्यालयात समन्वय बैठक पार पडली. पोलीस सहआयुक्त (वाहतूक) श्री. सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन सोहळ्यादरम्यान वाहतूक नियंत्रण तसेच विविध प्रकल्पांच्या सुरू असलेल्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेषतः श्रीगणेशमूर्ती आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांचे नियोजन, आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती, सुरक्षा उपाययोजना आणि नागरिकांना कमीतकमी त्रास होईल यासाठी आवश्यक समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस महानगरपालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) श्री. विक्रम देशमाने, अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) श्रीमती मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त (मध्य परिमंडळ-२) श्री. अनुराग जैन, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) श्रीमती वृषाली इंगुले यांच्यासह रेल्वे आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात नागरिक, गणेशभक्त आणि मंडळांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Scroll to Top