कराड : सर उदयसिंह पाटील युवा मंच यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा विठोबाची वाडी, तालुका कराड येथे शनिवार दिनांक 8/8/2026 रोजी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमास गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये अमोल सुतार, रत्नदीप गुरव, विकास सर, योगेश पाटील, बापुराव चव्हाण यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून आदरणीय विलासरावजी पाटील काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त या युवा मंचच्या वतीने सातत्याने शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापुढेही प्रत्येक वर्षी हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवण्याची ग्वाही युवा मंचच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना विठोबाची वाडी गावचे बापूराव चव्हाण यांनी केली. तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पवार यांनी केले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी असे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, यामुळे शिक्षणाची गोडी वाढते असे मत व्यक्त केले. प्रत्येक गावात अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास जिल्हा परिषद शाळा कधीही बंद पडणार नाहीत, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच प्रत्येक गावातील दानशूर व्यक्तींनी आपल्या जिल्हा परिषद शाळांना शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले.




