कामोठे : आजच्या Gen Z पिढीला दोष देण्यापेक्षा तिचे विचार, स्वप्ने आणि भावविश्व समजून घेऊन पालक व मुलांमधील संवाद अधिक दृढ करण्याची गरज आहे, असा सकारात्मक संदेश देणाऱ्या डॉ. गोरखनाथ पोळ लिखित ‘मी GEN X… एका Gen Z चा बाबा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
बदलत्या काळानुसार दोन पिढ्यांच्या विचारसरणी, जीवनशैली, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षण, करिअर, नातेसंबंध, संस्कार आणि संवादाच्या पद्धतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. या बदलांकडे संघर्षाच्या दृष्टिकोनातून न पाहता Gen X आणि Gen Z या दोन पिढ्यांमध्ये संवादाचा सेतू निर्माण व्हावा, या उद्देशाने डॉ. गोरखनाथ पोळ यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
शिक्षण क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवासोबतच एका वडिलांच्या भूमिकेतून लेखकाने Gen Z पिढीकडे पाहण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. आजच्या तरुणांचे स्वतंत्र विचार, त्यांची स्वप्ने, तंत्रज्ञानाशी असलेले नाते, करिअरविषयक बदललेला दृष्टिकोन तसेच पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या भावना यांचा सहज, संवेदनशील आणि सकारात्मक पद्धतीने वेध पुस्तकात घेण्यात आला आहे.
“Gen Z ला बदलण्याआधी त्यांना समजून घेऊया; उपदेशापेक्षा संवादाला आणि अपेक्षांपेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व देऊया,” हा पुस्तकाचा मध्यवर्ती विचार असून, पालक, शिक्षक आणि तरुण पिढी यांच्यातील वाढती दरी कमी करण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
प्रकाशन सोहळ्यास सुषमा पाटील विद्यालयाचे संस्थापक-चेअरमन दिलीप पाटील, कामोठे येथील नगरसेवक विकास घरत, डॉ. भगत, आंतरराष्ट्रीय वक्ते डॉ. पवन अग्रवाल, डॉ. मंदार पनवेलकर, डॉ. अनंत धरणेकर, श्रावण घरत, सुविद्या विद्यालयाचे चेअरमन, जाधव, केतकी प्रकाशनचे संस्थापक चंद्रकांत जाधव, बाळासाहेब फडतरे, स्मिता पनवेलकर, रमेश संकपाळ, भाई पाटील, विजय पाटील, राहुल राणे, प्रकाश वाळुंज, संजय किसवे, अर्जुन गोवारी, दिलीप गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माइंडसेट गुरू प्रा. दिनेश गुप्ता, विजय सावंत सर, गोरख जेधे, फडतरे सर, सुयश सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रमेश संकपाळ सर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश खरात यांचीही उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाच्या विषयाचे विशेष कौतुक केले. पालकांनी केवळ मुलांना शिकवण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि बदलत्या पिढीला समजून घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने हे पुस्तक केवळ Gen Z विषयीचे पुस्तक नसून पालक, शिक्षक आणि तरुण पिढी यांच्यात परस्पर समज, विश्वास आणि संवाद वाढविणारा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




