मुंबई : देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावेल. या संस्थेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत शहरी सहकारी बँकिंगचे जाळे विस्तारण्यास चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे (NUCFDC) मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलविण्याची घोषणा त्यांनी केली.
मुंबईतील बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा’मध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
देशात सुमारे १,४०० शहरी सहकारी बँकांमध्ये सहा लाख कोटी रुपयांच्या ठेवी असून, छोटे व्यापारी, एमएसएमई, महिला बचत गट आणि मध्यमवर्गीयांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात या बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे शाह यांनी सांगितले.
अंब्रेला संस्थेच्या माध्यमातून बँकांना सायबर सुरक्षा, आधुनिक सॉफ्टवेअर, प्रशिक्षण आणि सुरक्षा संचालन केंद्राची सुविधा मिळणार आहे. यावेळी शहरी सहकारी बँकांसाठी सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (SOC) चे उद्घाटन तसेच राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ आणि NUCFDC यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.




