नवी मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सन 2022 पासून ‘हर घर तिरंगा’ ही अभिनव मोहीम सुरू करण्यात आलेला आहे. जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे ही या मोहीमेची मुख्य संकल्पना असून या मोहीमेला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.
या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम राबवित सहभागी होत आहे. यावर्षी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने या मोहीमेची संकल्पना या गीताशी जोडलेली आहे. त्याचप्रमाणे 14 ऑगस्ट 2026 रोजी ‘फाळणी भयावहता स्मृती दिन’ पाळण्यात येणार आहे.
याबाबत शासन आदेशानुसार महानगरपालिका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याविषयी विशेष बैठक घेत संबंधित विभागांना अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली शासकीय परिपत्रकानुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले.
या अंतर्गत शहरातील घरांवर, व्यवसाय / कार्यालयांच्या ठिकाणी दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकविणे अपेक्षित असून नागरिकांनी तिरंगा सेल्फीसह त्याची छायाचित्रे काढून ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे तसेच #harghartiranga2026 या हॅशटॅगसह सोशल मिडियावर छायाचित्रे अपलोड करावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
याप्रमाणेच हर घर तिरंगाच्या वेबसाईटवर जाऊन स्वयंसेवक नोंदणी करावी आणि स्वयंसेवक प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे असेही आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांना तिरंगा ध्वज सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात येत असून त्याठिकाणी सवलतीच्या दरात नागरिकांना ध्वज उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
याशिवाय सर्व शाळांमध्ये त्यांच्या परिसरात तिरंगा रॅली काढून जनजागृती करणे तसेच चित्रकला, निबंध अशा स्पर्धांचे आयोजन करून त्याचप्रमाणे अनुषांगिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यात येणार आहे.
मुख्यालय स्तरावरूनही महापौर श्रीम.सुजाता पाटील व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली, तिरंगा सायकल रॅली असे जनजागृतीपर उपक्रम लोकसहभागातून राबविण्याचे नियोजन आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत या कालावधीत ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ हा स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये लोकसहभागाला प्राधान्य देण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह प्रमुख वास्तूंना आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात येणार असून मुख्यालयात भव्यतम तिंरगी रांगोळीव्दारे राष्ट्रभक्तीचा संदेश प्रसारित केला जाणार आहे.
दि. 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भयावहता स्मृतीदिन’ म्हणून पाळण्याचे सूचित करण्यात आले असून त्यानिमित्त शासनामार्फत तयार करण्यात आलेले फाळणीविषयक प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने तयार केलेले ‘हर घर तिरंगा’ प्रदर्शन आणि ‘वंदे मातरम्’ प्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थी, नागरिक सहभागासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत शासन आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ मोहीम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उत्साहाने राबविण्यात येत असून यामध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व घटकांच्या व्यापक सहभागावर भर देण्यात येत आहे.




