मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीत दि. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सदर योजना दि. १ जुलै २०२६ पासून ‘आपले सरकार’ पोर्टलवर राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत कार्यान्वित करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्यभरातून मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत असल्याने काही वेळा तांत्रिक अडचणी व सर्व्हरवरील ताणामुळे अर्ज भरण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच विविध कलावंत संघटनांकडूनही मुदतवाढ देण्याची विनंती प्राप्त झाली होती.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना अर्ज सादर करण्याची पुरेशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना या मुदतवाढीचा लाभ घेऊन दि. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन ॲड आशिष शेलार मंत्री, सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी केले आहे.




