ताज्या बातम्या

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : स्वप्नांना पंख देणारे ‘मिसाईल मॅन’

विशेष(भीमराव धुळप) : भारतरत्न, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती आणि “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
१५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे अत्यंत साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत वर्तमानपत्रे विकत शिक्षण पूर्ण करणाऱ्या कलाम यांनी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर भारतीय विज्ञानविश्वात अढळ स्थान निर्माण केले. इस्रो आणि डीआरडीओमध्ये कार्यरत असताना त्यांनी भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाला नवे बळ दिले. अग्नी आणि पृथ्वी यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या विकासामुळे त्यांना “भारतीय क्षेपणास्त्र प्रणालीचे जनक” म्हणून गौरवण्यात आले. १९९८ मधील पोखरण अणुचाचणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते.
२००२ ते २००७ या काळात राष्ट्रपती म्हणून त्यांनी जनतेच्या मनात “लोकांचे राष्ट्रपती” अशी ओळख निर्माण केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि “मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी कठोर परिश्रम करा” हा संदेश देणे हे त्यांच्या जीवनकार्याचे वैशिष्ट्य होते. ‘अग्निपंख’, ‘इंडिया 2020’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली.
२७ जुलै २०१५ रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांचे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ज्ञानदान करणाऱ्या या महान शास्त्रज्ञाचे जीवन प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा प्रकाश सदैव भावी पिढ्यांना दिशा देत राहील.

Scroll to Top