सातारा(विजय जाधव) : जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वात उदयोन्मुख क्रिकेटपटू सिध्दांत केतन दोशी यांची रणजी क्रिकेट टीमच्या निवड चाचणीत तब्बल १९० धावांची दमदार कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन त्याची महाराष्ट्र रणजी संघाच्या २०२६-२७ हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या ३५ संभाव्य खेळाडूंच्या यादीत निवडीमुळे जिल्ह्यात क्रिकेट प्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.
रणजी निवड चाचणी सामन्यांमध्ये सिद्धांतने फलंदाजी करताना धडाकेबाज १९० धावा काढल्या. त्या निवड चाचणीवेळी सर्वाधिक धावा ठरल्या.त्याच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजीमुळे निवड समितीचे त्याची महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीमच्या संभाव्य खेळाडू मध्ये त्यांची निवड झाली आहे.
याशिवाय एमसीए इन्व्हिटेशन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाविरुद्ध सिद्धांतने शानदार शतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. निर्णायक सामन्यांतील त्याच्या कामगिरीमुळे तो महाराष्ट्र क्रिकेटमधील आश्वासक युवा फलंदाज म्हणून पुढे आला आहे.
सिद्धांतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ, अविनाश कदम, बाळचंद्र निकम, प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा सचिव राजू पाटील, सातारा शहरातील गुजराती समाजातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
सिद्धांतचे वडील केतन दोशी हे सुद्धा रणजी क्रिकेट खेळाडू होते. आगामी रणजी हंगामात महाराष्ट्र संघासाठी तो उल्लेखनीय कामगिरी करुन साताऱ्याच्या क्रिकेट परंपरेला नवी उंची आता सिद्धांत दोशी यांच्या कामगिरीने वाढणार आहे. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या नाव लौकिकात यापुढे तो आणखी भर टाकणार, असा विश्वास प्रशिक्षक आणि कुटुंबाने व्यक्त केला आहे.
.




