ताज्या बातम्या
शिवसेना शिवडी विधानसभा व वैद्यकीय मदत कक्षातर्फे के.ई.एम. रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांचा सत्कारराजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त निबंध स्पर्धा ! पत्रकार राजन पारकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक ; काव्य स्पर्धेत अमित माने पहिलेमहिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी  ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरेहौसाई विद्यालयात गरीब विद्यार्थिनींना सायकल व ४० विद्यार्थ्यांना सँडल्सचे वाटप; शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे – राजेश खराटेबल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचा सभासद प्रशिक्षण सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

शब्दांची साधना, समाजसेवेची आराधना… ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व समाजसेवक दत्ताराम घुगे यांचा जीवनप्रवासाचा अमृतमहोत्सवी अध्याय..(१५जुलै वाढदिवसानिमित्त)

सत्तराव्या वर्षात पदार्पण करणारे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि समाजसेवक दत्ताराम घुगे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाही, तर पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक बांधिलकीचा एक समृद्ध प्रवास आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजमनाचा आवाज बनण्याचे कार्य केले आहे.
काळाच्या प्रवाहात अनेक पत्रकार येतात आणि जातात; परंतु आपल्या विचारांनी, कार्याने आणि मूल्यनिष्ठ भूमिकेने समाजावर कायमचा ठसा उमटविणारी काही व्यक्तिमत्त्वे इतिहासात नोंदली जातात. दत्ताराम घुगे यांचे नाव अशाच व्यक्तिमत्त्वांमध्ये आदराने घेतले जाते.
पत्रकारिता ही त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नव्हता, तर समाजऋण फेडण्याची एक साधना होती. सामान्य माणसाचे प्रश्न, सामाजिक विषमता, जनहिताचे विषय आणि परिवर्तनाची गरज यांना त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. लोकसत्ता, नवशक्ती, सामना, गावकरी आणि देशदूत यांसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाचा ठसा उमटला.
पत्रकारितेबरोबरच प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्याही त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. महाराष्ट्र शासनाच्या गृह निर्माण विभागातील दुरुस्ती सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) सल्लागार पॅनेलचे सदस्य, भारतीय रेल्वे राजभाषा सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच विविध केंद्र व राज्यस्तरीय समित्यांवर त्यांनी काम केले. या माध्यमातून त्यांनी आपल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा उपयोग समाजहितासाठी केला.
साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. भारतीय दलित साहित्य अकादमी, बृहन्मुंबईचे अध्यक्ष म्हणून त्यांनी साहित्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. सामाजिक जाणीव आणि मानवतावादी विचार हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. मुंबईचा फिरिस्ता म्हणून ही त्यांची ओळख आहे.येथील गल्लीबोळ रस्ते, कोणत्या रस्त्याला कोणाचे नाव आहे. हे सर्व घुगे यांच्या तोंड पाठ आहे.
दादरच्या शिंदेवाडी येथील वृत्तपत्र लेखक संघाचे कार्यालयाची जबाबदारी एक कार्यवाह म्हणून खूप निष्ठेने पार पाडली. ती ओळख आजही पुसली जात नाही.

आकाशवाणी मुंबईवरील ‘युववाणी’ कार्यक्रम तसेच दूरदर्शनवरील सूत्रसंचालक, मुलाखतकार आणि कथाकथनकार म्हणून त्यांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. पत्रकार संघटनांमध्ये सक्रिय राहून पत्रकारांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठविला.
त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.
आज सत्तराव्या वर्षात पदार्पण करताना दत्ताराम घुगे यांच्या आयुष्याचा प्रवास म्हणजे अनुभव, संघर्ष, चिंतन आणि समाजसेवेचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. वयाची वर्षे वाढत असली तरी समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची ऊर्जा आणि शब्दांवरील विश्वास आजही तितकाच तरुण आहे.
“वयाच्या सत्तराव्या वळणावरही समाजहिताची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या कर्मयोग्याच्या लेखणीला आणि कार्याला सलाम…”

खंडूराज गायकवाड – ज्येष्ठ पत्रकार

Scroll to Top