सातारा – कराड राष्ट्रीय महामार्गालगत अनेक ठिकाणी काही व्यावसायिकांनी जाहिरातींचे मोठे फलक व रिफ्लेक्टर बोर्ड लावून सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रिफ्लेक्टर बोर्डांवर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश परावर्तित होऊन समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर तीव्र झोत पडत असल्याने वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनचालकांच्या मते, या फलकांमुळे काही क्षणांसाठी दृष्टी धूसर होत असून अपघाताचा धोका वाढत आहे. महामार्गावरील सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभारण्यात आलेले जाहिरात फलक आणि रिफ्लेक्टर बोर्ड तातडीने हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग हा सार्वजनिक वाहतुकीसाठी असून कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यावसायिकाने अनधिकृतपणे जागा ताब्यात घेणे किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फलक उभारणे नियमबाह्य असल्याचे जाणकार सांगतात. संबंधित विभागाने पाहणी करून अनधिकृत फलकांवर कारवाई करावी, तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
“महसूल प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणा या धोकादायक रिफ्लेक्टर बोर्डांवर तातडीने कारवाई करणार का?” असा सवाल आता वाहनचालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




