तापोळा (अजित जगताप) : नैसर्गिक वरदान लाभलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी- सोळशी , बामणोली ,तापोळा खोऱ्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने जगभरचे पर्यटक येत असतात. परंतु या ठिकाणी डिजिटल इंडिया च्या परिघा बाहेर हा प्रदेश असल्याचे जाणवत आहे. या ठिकाणी बी.एस.एन.एल. आणि जिओ इंटरनेट मोबाईल कंपनीचे टॉवर उभे आहेत. पण, रेंज नसल्याने जगाशी संपर्क तुटत आहे. याबाबत या परिसरातील गोरगरीब, कष्टकरी भूमिपुत्रांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अनंत जाधव यांनी दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित करावी. अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेकांनी पुनर्वसन करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला . परंतु आजही अतिदुर्गम व मागासलेल्या या भागात अनेक लोक आदिवासी जीवन जगत आहेत. या ठिकाणी पावसाळ्या नव्हे तर वर्षभर सातत्याने खंडित होणाऱ्या मोबाईल नेटवर्कमुळे स्थानिक नागरिक व्यवसायिक आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते अनंत जाधव चतुर बेट, (तापोळा) यांनी सातत्याने आवाज उठवून शासन दरबारी पत्रव्यवहार केलेले आहेत. लोकप्रतिनिधींकडेही सातत्याने मागणी केली आहे. अद्यापही यंत्रणा सुधारणेमध्ये यश मिळाले नाही. महाबळेश्वर तालुक्यातील अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये अद्यापही मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या निर्माण होत आहे. सरकारी दूरसंचार यंत्रणा म्हणून भारत संचार निगम लिमिटेड नेटवर्क कडे आशाळभूतपणाने स्थानिक लोक पाहत आहेत. अनेक गावांमध्ये रस्ते, इंटरनेट सेवा पोहोचू शकलेले नाही. एसटी बस धावत नाही. आजूबाजूच्या परिसरात टॉवर उभे आहेत पण, इंटरनेट पोहचले नाही. यामुळे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी, नागरिक, विद्यार्थी आणि माता-भगिनी व पर्यटकांना या भागातून संपर्कासाठी हाल सहन करावे लागत आहे. गतवर्षीच्या कालावधीमध्ये बी.एस.एन.एल. कंपनीने गावोगावी अनेक बी.एस.एन.एल. टॉवर उभे केले. स्थानिक भूमिपुत्रांनीही भावी पिढीसाठी आपल्या जमिनी टॉवर उभारणीसाठी अल्प मोबदल्यात दिल्या. परंतु, त्याचा उपयोग स्थानिक नागरीक होताना दिसत नाही, नेटवर्क कमकुवत असल्याचे सातत्याने जाणवत आहे.
महाबळेश्वर शहर वगळता तालुका हा अतिदुर्ग, डोंगराळ तसेच घनदाट जंगलाचा भाग आहे . तसेच हवामानातील बदलामुळे विशेषता पावसाळ्यात संपर्क तुटला जातो. ओढे , नाले यांना पावसाच्या पाण्याने पूर येतात. रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. आजारी माणसांना तर आपलं वेदना सांगण्यासाठी उपाय राहत नाही. संपर्कविना अनेक जणांना घरीच थांबावे लागते. सध्या अनेक भागात केवळ बीएसएनएलचे टॉवर उपलब्ध आहेत. तांत्रिक अडचणीमुळे त्यांची सेवा तसेच अनेकदा वीजपुरवठाही खंडित होतो. टॉवर्सना बॅकअप न मिळाल्यामुळे बॅटरी संपताच नेटवर्क पूर्णपणे गायब होते. यामुळे ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट, शासकीय कामे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण यामध्ये वारंवार अडथळे निर्माण झालेले आहेत. शासकीय कंपनी उपकरणांचे अद्ययावतकरण न झाल्याने ४जी आणि ५जी सेवांचा अभाव आहे. इंडिया मेरी मुठ्ठी मैं जाहिरात बाजी करताना याबाबत इंटरनेट नसल्याने झाकली मूठ पोकळ वाटते. येथील स्थानिक लोकांना पावसाळ्यात गाव सोडून दुसरीकडे जावेसे वाटते. पर्यायी यंत्रणा कार्यान्वित केल्यास या भागात विकास होऊ शकतो. असेही स्थानिक भूमिपुत्रांनी सांगितले.
या भागातील घाट व अरुंद रस्त्यावरील पावसाळ्यात दरडी कोसळणे किंवा झाडे पडल्यास प्रशासनाशी संपर्क साधणे सोपे व्हावे . यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने सुद्धा लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी काही तरुण मुलांना मोबाईल घेऊन डोंगरावर किंवा उंचवट्यावर जावे लागते. काहीजण झाडावर बसूनच ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करतात. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या कांदाटी , सोळशी , उचाट, मोरणी, लामज, हिंदी वलवन,चतुरबेट, झांजवड, दुधगाव, गोरोशी, घोणसपूर, देवळी, खरोशी, काळगाव, शिवाजी वाडी अशा भागामध्ये इंटरनेट सेवा मिळाल्यास खऱ्या अर्थाने त्यांचा जगाशी संपर्क राहील यासाठी आता अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधी यांनीच मानवता भावनेतून लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. ……………………………. फोटो- तापोळा भागात इंटरनेट सेवेसाठी पण करणारे भूमिपुत्र (छाया- अजित जगताप, चतुर बेट)




