ताज्या बातम्या

राज्यातील महिलांना आता गुलाबी (पिंक) ई-रिक्षा मंत्री अदिती तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, चालू आर्थिक वर्षात किमान ५ हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.

या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ई-रिक्षा चालविणारी व्यक्ती महिला असणे ही अट ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत १३० गुलाबी ई-रिक्षांचे वितरण करण्यात आले असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई-रिक्षाच्या खर्चापैकी २० टक्के अनुदान शासनाकडून, ७० टक्के बँक कर्जाद्वारे आणि १० टक्के लाभार्थीचा सहभाग ठेवण्यात आला आहे.

ई-रिक्षा चालक महिलांसाठी प्रशिक्षण, चार्जिंग स्टेशनची सुविधा आणि इतर आवश्यक बाबींची जबाबदारी पुरवठादार कंपनीवर सोपविण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांमध्ये जनजागृती, प्रशिक्षण आणि विभागांतील समन्वय वाढवून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

Scroll to Top