मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन श्रमसंहितांच्या (Labour Codes) तसेच त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या नियमांच्या अंमलबजावणीला विरोध करण्यासाठी राज्यातील विविध कामगार संघटना ३ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, कामगारांचे हक्क आणि हित अबाधित ठेवण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
संयुक्त कृती समितीच्या म्हणण्यानुसार, नवीन श्रमसंहितांच्या अंमलबजावणीमुळे कामगारांच्या विद्यमान सेवा अटी, रोजगारातील सुरक्षितता, वेतन, सामाजिक सुरक्षा तसेच संघटनात्मक अधिकारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोणतेही नियम लागू करण्यापूर्वी सर्व कामगार संघटना आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
कामगारांच्या हिताला बाधा पोहोचेल असे कोणतेही नियम लागू करू नयेत, तसेच कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. अन्यथा कामगारांवर वेठबिगारीसारखी परिस्थिती ओढवू शकते, असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात टी.यू.सी.आय., सीटू, इंटक, एच.एम.एस., टी.यू.सी.सी., आयटक, बी.के.एस., आय.सी.सी.टी.यू., एम.आय.यू.टी.यू.सी. आणि यु.टी.यू.सी. या विविध कामगार संघटना सहभागी होणार आहेत.
यावेळी विवेक माँटेरो, दामले, संतोष चाळके, निवृत्ती धुमाळ, गोविंदराव मोहिते यांच्यासह संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.




