मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का देत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील नेत्यांच्या पक्षांतरानंतर ही आणखी एक महत्त्वाची घडामोड ठरली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी तसेच महायुतीचे इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सचिन अहिर यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे मुंबईसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




