मुंबई : आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘युगप्रवर्तक डॉ हेडगेवार’ या भव्य नाट्याच्या ५१ व्या प्रयोगाचा उदघाटन सोहळा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २९) रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झाला. नागपूर येथील नादब्रह्म फाउंडेशनतर्फे या नाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.
गेल्या शंभर वर्षांत डॉ. हेडगेवार यांनी नागपूर येथे रोवलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले असून त्याच्या शाखा भारताच्याच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये विस्तारल्या आहेत. सेवा, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि तपश्चर्या हीच संघाची खरी ओळख आहे, असे उद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी काढले.
डॉ. हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली संघाने स्थापनेनंतरच्या पहिल्या पंधरा वर्षांत भक्कम वैचारिक आणि संघटनात्मक पाया घातला. त्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी या कार्याचा देशव्यापी विस्तार केला. पुढे बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या, के. सी. सुदर्शन, डॉ मोहन भागवत या सरसंघचालकांनी संघविचार जनमानसापर्यंत पोहोचविला, असे राज्यपालांनी नमूद केले.
संघामध्ये जात, पंथ किंवा सामाजिक भेदभावाला स्थान नाही. संघटनेची खरी ताकद स्वयंसेवकांच्या निस्वार्थ समर्पणात आहे, असे राज्यपालांनी नमूद केले.
आगामी काळात ग्रामीण भाग, वनवासी क्षेत्रे तसेच जनजातीय आणि विशेषतः अतिमागास जनजातीय समाजापर्यंत शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे पोहोचवावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.
उदघाटन सोहळ्याला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, नादब्रह्म फाउंडेशनचे अध्यक्ष पद्माकर धानोरकर, रास्व संघाचे मुंबई महानगर सहसंघचालक डॉ विष्णू वझे, हावरे बिल्डर्सचे डॉ सुरेश हावरे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, समन्वयक सुमेध चव्हाण व गौरव फुखर आदी उपस्थित होते.




