ताज्या बातम्या

श्री प्रतिष्ठानतर्फे १९ वा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

नवी मुंबई : कोपरखैरणे गावातील होळी मैदान येथे श्री प्रतिष्ठान आणि प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक शिरीष पाटील यांच्या वतीने १९ वा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पाणीपुरवठा सभापती रविकांत पाटील, नगरसेविका मीनाक्षी किशोर पाटील आणि डी. आर. पाटील, इ प्रभाग समिती अध्यक्ष मोरे मॅडम, परिवहन विभाग सदस्य श्रेया सकपाळ उपस्थित होते.
या सोहळ्यात दहावी, बारावी, पदवीधर, डॉक्टर, वकील, सीए व पायलट झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना सुटकेस, संगणक बॅग व कागदपत्रांसाठी दर्जेदार बॅग,घड्याळ भेट देण्यात आली.
माजी खासदार संजीव नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षणासाठीच्या १० कोटी रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख करत एमपीएससी, यूपीएससीसह स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच नगरसेवक शिरीष पाटील यांनी गेली १९ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
माजी महापौर सुजाता पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाचे स्वागत केले. महापालिकेच्या शैक्षणिक योजनांबरोबरच सीबीएसई शिक्षणाच्या विस्ताराची माहिती देत शिक्षणातूनच समाजाची प्रगती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बँड पथक तसेच अखंड हरिनाम सप्ताहात सेवा देणाऱ्या वारकरी बांधवांचाही सन्मान करण्यात आला.

Scroll to Top