सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याचे केंद्रबिंदू काँग्रेस भवन सातारा हे होते. आजही काँग्रेसचे मतदार टिकून आहेत. काही नेत्यांनी सत्तेची ऊब नियमित मिळावी यासाठी पर्याय शोधला आहे. अशावेळी पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दिल्यामुळे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसने पुन्हा एकदा वीस वर्षांनी कमान सांभाळण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काही राजकीय घराण्याला प्रोत्साहन दिल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले. आज राजकीय घराण्यांनी पक्ष बदलला पण सामान्य कार्यकर्ता व मतदार काँग्रेस सोबतच आहे. हे शुक्रवार दिनांक २६ जून रोजी काँग्रेस भवन कार्यालयात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी दिसून आले आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा भवन मधील संगम पाहून नेत्यांना सुद्धा सुखद अनुभव आला आहे.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून निष्ठेचे प्रतीक म्हणून मानले जात होते. स्वातंत्र्य चळवळीत या कमिटीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वातंत्र्य सेनानी किसन वीर आबा व अनेक मान्यवरांनी खूप मोठे योगदान दिले. १९६० च्या दशकापासून काँग्रेसची गाय वासरू.. नका विसरू.. चरखा. हाताचा पंजा अशी पक्षाची चिन्ह मतदारांच्या लक्षात आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिरकाव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने काँग्रेस रानातील गवत उपटून टाकण्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी धन्यता मानली. जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रभाव कमी झाला . पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सातत्याने विविध आंदोलने झाली . त्यामध्ये सामान्य सातारकर दिसलाच नाही. साताऱ्यातील राजघराण्याला काँग्रेसने हात दिला. पण हा हातातील हात फार काळ टिकू शकला नाही. मात्र त्या कालच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची चांगलीच परवड झाली.
साताऱ्याच्या काँग्रेस भवनातून एकेकाळी राज्य आणि देशपातळीवरील अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जात होते. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले, विलासराव पाटील उंडाळकर, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शंकरराव जगताप, चिमणराव कदम, जंगम गुरुजी व मान्यवरांनी साताऱ्यातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले आहे . १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची निवड झाली आहे . आणि त्यांच्या व निष्ठावंत राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पायगुणाने पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात काँग्रेस गतवैभव प्राप्त होईल अशी आशा पल्लवीत झालेली आहे.
काँग्रेस विचारधाराशी प्रामाणिक असणारे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, अँड .श्रीकांत चव्हाण, अजित पाटील चिखलीकर, भानुदास माळी, जगन्नाथ कुंभार, राहुल पवार, भूषण रानभरे ,मालन पडळकर, अशोकराव पाटील,अँड .दत्ता धनावडे, रजनी पवार, सुषमा राजेघोरपडे, प्राची ताकतोडे, कांचन साळुंखे सुनील उबाळे , प्रकाश परामणे, आनंदराव जाधव, असीम इनामदार, सतीश धुमाळ , वासिम बागवान, संदीप माने, मनोज कुमार तपासे, प्रकाश सावंत, संतोष काशीद अशा अनेक काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा खेड्यापाड्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेला आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. आज साताऱ्यातील काँग्रेस भवन मधील वातावरण म्हणजे खऱ्या अर्थाने महायुती सत्ताधाऱ्यांसाठी इशारा ठरला आहे. आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हणमंतराव पवार यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता काँग्रेस वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मशाल पेटवावी. अशी सामान्य मतदारही मागणी करू लागलेले आहेत.
—————————————————-
फोटो — सातारा जिल्ह्यात बऱ्याच कालावधीनंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गजबजलेले काँग्रेस भवन…. (छाया- अजित जगताप, सातारा )




