सातारा (अजित जगताप).: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. त्याचा विपरीत परिणाम म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या पन्नास मीटर अंतरावरील नियोजन बैठकीसाठी चक्क पंचवीस खाजगी व सरकारी वाहनांचा ताफा सातारा शासकीय विश्रामगृहात आणला होता. सध्या आळंदी ते पंढरपूर मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी सर्वत्र नियोजनाचे काम सुरू आहे. सर्वसामान्य वारकऱ्यांना भक्तीरसात नाहून जाताना सुख सुविधा देऊन आपणही कर्तव्यदक्षता व पुण्याचे काम करावे. यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या पाठीमागील नवीन शासकीय विश्रामगृह या ठिकाणी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
या महत्वपूर्ण नियोजन बैठकीला सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष श्री राजू भोसले यांच्या समवेत विविध समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य आणि विविध खात्याचे खाते प्रमुख आणि अधिकारी वर्ग तसेच त्यांच्या सेवेसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची लगबग होती. वास्तविक पाहता सातारा जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या शासकीय विश्रामगृहात सर्वजण शतपावली म्हणून जरी चालत गेले असते तरी पन्नास ते शंभर लिटर इंधन बचत झाले असते. असे न घडता शासकीय गाड्या या थंड राहाव्यात म्हणून दीड तास चालू होत्या.
या ठिकाणी प्रसार माध्यमाचे काही प्रतिनिधी विना निरोप आवर्जून उपस्थित होते. परंतु, त्यांनाही नियोजन बैठकीबाबत कोणीही अधिकृत माहिती दिली नाही.
जुन्या शासकीय विश्रामगृहातील तळमजल्यावर शाकाहारी भोजन व्यवस्था असल्यामुळे अनेकांनी त्याचा मनमुराच स्वाद घेतला व काहींनी बैठक झाल्यानंतर परस्पर निघून जाण्यास धन्यता मानली. नियोजन बैठकीला हजर नसलेल्या काहीजणांनी अतिथी देवो भव समजून स्नेहभोजन उरकून घेतले. शाकाहारी जेवण असल्यामुळे अनेकांची फसगत झाली.
सातारा जिल्हा परिषद मार्फत वारकरी मंडळींना सुख सुविधा देणे. साठी नियोजन करणे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी काहीजण प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे.
सध्या पावसाळ्याच्या आगमनानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढे व पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. सदर पाणी शुद्धीकरण करून त्याच्यामध्ये टी.सी.एल. पावडर टाकणे गरजेचे आहे. याबाबत सर्वच ग्रामपंचायतीला सूचना करणे आवश्यक आहे.
वारकरी संप्रदाय दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश इथून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. अलीकडच्या काळात सातारा जिल्ह्याच्या सीमेरेषेवर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हौसे , नवसे , गवसे मोठ्या प्रमाणात राजकीय घुसखोरी करू लागलेली आहेत .असा अनुभव आलेला आहे.
दिंडीसाठी भक्ती भवानी पायी प्रवास करणाऱ्या बिचाऱ्या सामान्य वारकऱ्यांना श्री चे दर्शन मिळत नाही. राजकीय वारकऱ्यांना पटकन दर्शनाची संधी मिळते. हा विरोधाभास नक्कीच निषेधार्थ आहे. सत्ता येईल. जाईल पण केलेले कर्तव्य हे आयुष्यभर लोक लक्षात ठेवतात. ही गोष्ट सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवली पाहिजे. सातारा शासकीय विश्रामगृहातील वातानुकूलित खोलीमध्ये झालेले नियोजन हे वारकऱ्यांसाठी ही गारवा देणारे असावे. अशी अपेक्षा वारकरी संप्रदायाचे लोक व्यक्त करत आहेत. नुसत्या काही उठ बैस ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची खुश-मस्करी व वास्तवतेपासून लांब असणाऱ्या वार्तांकन करणाऱ्या काही प्रतिनिधी पेक्षा सातारा जिल्हा परिषदेने केलेले नियोजन हे महाराष्ट्राला कळावे. यासाठी वारकऱ्यांपर्यंत बातमी पोहोचवणाऱ्या सर्व निर्भीड व निस्वार्थी आणि प्रामाणिक राज्यस्तरीय माध्यमांना दूर का ठेवले? असा प्रश्न काही जाणकार व अभ्यासू पत्रकारांनी यावेळी उपस्थित केला.
इंधनाची बचत करण्यासाठी आता सत्ताधारी भाजपने लोकासंगे ब्रह्मज्ञान… स्वतः कोरडे पाषाण.. असे न वागता आत्मचिंतन करावे. श्री पालखीच्या स्वागतासाठी कमी गाड्यांचा ताफा उपयोगात आणावा. अशी नम्र मागणी होत आहे.
सातारा जिल्हा परिषद सत्तेसाठी खोटे गुन्हे व विरोधी पक्षातील सदस्यांच्या पळवा पळवी मार्फत मिळालेल्या सत्तेचा वापर योगीरीत्या करावा. कारण, सत्ता ही ताम्रपट नाही. तर ती सेवेकरी आहेत. आज शासकीय वाहनाचा वापर खुलेआम केला तरी काहींना सत्ता गेल्यानंतर एक तर स्वतःच्या वाहनाने किंवा भविष्यात पायीच प्रवास करावा लागणार आहे. याचाही कोणाला विसर पडू नये. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अथवा अधिकाऱ्यांनी भाष्य करणे टाळल्यामुळे त्यांची भूमिका समजू शकली नाही.
———————————-
फोटो –सातारा जि प नियोजन बैठकीला शासकीय विश्रामगृहातील वाहनांचा ताफा (छाया -अजित जगताप, सातारा)




