ताज्या बातम्या

कराडमध्ये स्मार्ट मीटरविरोधात सर्वपक्षीय निदर्शने; शेतीपंपांना तातडीने वीजपुरवठा न केल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा

कराड(प्रताप भणगे)

: कराड येथील तहसीलदार कार्यालय आणि महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात तसेच शेतीपंपांना तातडीने वीजपुरवठा सुरू करून पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
यंदा पावसाअभावी उगवून आलेली पिके धोक्यात आली असून, शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. औद्योगिक व कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात तीन दिवसांसाठी कपात करून ती वीज शेतीपंपांसाठी उपलब्ध करून द्यावी व सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशीही भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, पंचायत समिती सदस्य रवी बडेकर, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, कराड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशालीताई जाधव यांच्यासह शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्मार्ट मीटर योजनेला विरोध दर्शवित, पुढील दोन दिवसांत शेतीपंपांना वीजपुरवठा सुरू करून पिकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले नाही, तर तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला.

Scroll to Top