मुंबई(संतोष कदम) : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली धारावीकरांवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी सातत्याने संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट करत खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाहू नगर येथील रहिवाशांना बजावण्यात आलेल्या निष्कासनाच्या नोटिसा तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शाहू नगर येथील महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या ४७ निवासी इमारतींमध्ये गेल्या ४५ ते ५० वर्षांपासून मनपा कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि भाडेकरू कुटुंबे वास्तव्यास आहेत. अशा कुटुंबांना कोणतीही पर्यायी व्यवस्था न देता अवघ्या सात दिवसांत घरे रिकामी करण्याची नोटीस देणे अन्यायकारक असून, संबंधित नोटिसा तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली.
प्रभावित कुटुंबांना शाहू नगर परिसरातील उपलब्ध जागेत किंवा अन्य योग्य ठिकाणी प्रत्यक्ष पर्यायी पुनर्वसन उपलब्ध करून दिल्याशिवाय कोणतीही निष्कासन अथवा पाडकामाची कारवाई करण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली.
तसेच धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे, ही भूमिका पुन्हा अधोरेखित करत बेस्ट डेपो, टाटा पॉवर, निसर्ग उद्यान आणि रेल्वेच्या जमिनीवरील रहिवाशांचे स्थलांतर करताना त्यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुन्हा धारावीतच घरे देण्यात येतील, याची शासनाने स्पष्ट आणि लेखी हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीला आमदार ज्योती गायकवाड याही उपस्थित होत्या. शाहू नगर आणि धारावीतील रहिवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा आणि संघर्ष यापुढेही कायम राहील, असा निर्धार खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.




