दवंडेवाडी : जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला.
रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी नवतरुण सेवा मंडळ, कोळबांद्रे-दवंडेवाडी आणि आदर्श महिला मंडळ, दवंडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कु. समीक्षा बेर्डे हिला शाल, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या समीक्षाने कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिची मुंबई पोलीस दलात झालेली निवड ही केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण दवंडेवाडी आणि परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
याप्रसंगी दिवा शहरातील कुणबी समाजाच्या वतीनेही समीक्षाचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच तिच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आदर्श महिला मंडळाच्या वतीने केक कापून हा आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास नवतरुण सेवा मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र दाजी खळे, सचिव मंगेश रामचंद्र दवंडे, खजिनदार वसंत नारायण दवंडे, आदर्श महिला मंडळाच्या संघटिका अर्चना खळे, अध्यक्षा वर्षा खळे, कुणबी संघटनेचे बबन सकपाळ, सुनील आग्रे, नितीन लोखंडे, दिलीप शिगवण, राजेश चिनकटे तसेच गणेश दवंडे, दिनेश दवंडे, रामचंद्र बेर्डे, राजेश बेर्डे, नितीन दवंडे, यशवंत खळे, गंगाराम खळे, शैलेश दवंडे, विश्वास दवंडे, महेंद्र दवंडे, संजय दवंडे, सतीश खळे, अक्षय बेर्डे, संदेश दवंडे यांच्यासह योगिता जयराम बेर्डे, स्मिता वसंत दवंडे, श्रुती यशवंत खळे, साक्षी राजेश बेर्डे, प्राची गणेश दवंडे आणि सान्वी सतीश खळे उपस्थित होते.
गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या कु. समीक्षा बेर्डे हिच्या यशाबद्दल उपस्थितांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




