ताज्या बातम्या

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची राज्य कार्यकारिणी सभा उत्साहात संपन्न; द्वितीय वर्धापन दिनाच्या तयारीला सुरुवात

मुंबई, दि. १३ जून २०२६ : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची राज्य कार्यकारिणी व सर्वसाधारण सभा शनिवार, १३ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संस्थापक अध्यक्ष राजारामभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सभेला उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर, सचिव एच. बी. जंगम, खजिनदार सुरेश पाटील, सदस्य शालिनीताई म्हात्रे, मुंबई अध्यक्ष अभिनेते अरुण कदम, संघटक सचिव संतोष लिंबोरे, सचिव संघटक संदेश जाधव यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्गमधून भालचंद्र केळुसकर, महेश सावंत, तर सातारा जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
सभेत प्रतिष्ठानच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हा भव्य कार्यक्रम २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी समन्वयाने काम करण्याचे ठरविले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यावर विशेष भर देण्यात आला.
वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात दिंडी सोहळ्याने होणार असून, श्री विठ्ठल मंदिर, वडाळा ते षण्मुखानंद हॉल, किंग्ज सर्कल, सायन असा दिंडी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानसाठी सात गुंठे जागा दान दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष राजारामभाऊ शेलार, उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर, सचिव शालिनीताई म्हात्रे, खजिनदार सुरेश पाटील, कार्याध्यक्ष गणेश पाटील तसेच प्रसिद्ध अभिनेते व ‘हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष राजारामभाऊ शेलार यांनी प्रतिष्ठानच्या भावी उपक्रमांची माहिती दिली. “तालुका तेथे संगीत विद्यालय” हा संकल्प प्रतिष्ठानने हाती घेतला असून, ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच अहिल्यानगर येथे संगीत विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले असून, आगामी काळात सिंधुदुर्ग, सातारा, महाबळेश्वर, अमरावती, धुळे आदी जिल्ह्यांमध्येही संगीत विद्यालयांच्या इमारती उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक संतोष लिंबोरे यांनी केले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक माता-भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. अमरावतीच्या मायाताई, तृप्तीताई, सातारा जिल्ह्यातील तमाशा कलावंत महिलांसह इतर मान्यवर भगिनींचा सन्मान प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तथा उरण च्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यभरातील कलाकारांना एकत्र आणून कला, संस्कृती आणि संगीत क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असून, आगामी द्वितीय वर्धापन दिन सोहळा राज्यातील कलाकारांसाठी एक भव्य सांस्कृतिक पर्व ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.आभार राज्य सचिव संघटक संदेश जाधव यांनी मानले.

Scroll to Top