उंब्रज (ता. कराड) : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक राज्यातील विविध एसटी डेपोना भेट देऊन तेथील सुविधा आणि कामकाजाची पाहणी करत आहेत. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील महत्त्वाच्या उंब्रज बसस्थानकाला देखील त्यांनी भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुंबई–पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असलेल्या उंब्रज बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. विशेषतः स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने दूरवरून येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बसमधून उतरलेल्या प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी योग्य व्यवस्था नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यातील प्रमुख मार्गावरील हे बसस्थानक असूनही प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आणि संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन उंब्रज बसस्थानकात स्वच्छतागृहासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सर्वसामान्य लालपरीतील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.




