नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शहर पथविक्रेता समितीच्या पथविक्रेता प्रवर्गातील आठ सदस्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी 4 जून 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. महिला राखीव एका जागेसाठी चार तर सर्वसाधारण प्रवर्गातील दोन जागांसाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
यापूर्वी अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक आणि विकलांग (दिव्यांग) प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेसाठी केवळ एकच अर्ज वैध ठरल्याने संबंधित उमेदवार बिनविरोध निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने ती जागा रिक्त राहिली.
नवी मुंबईतील विभागनिहाय 9 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत मतदान झाले. बायोमेट्रिक सर्वेक्षणात नोंद असलेल्या 7009 मतदारांपैकी 3408 पथविक्रेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी 48.62 इतकी नोंदविण्यात आली.
मतदानानंतर बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सायंकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मतमोजणी पार पडली. निकालानुसार खालील उमेदवार विजयी झाले आहेत.
निवडणुकीचा निकाल
🔹 अनुसूचित जाती (महिला) – सौ. ज्योती दिपक पोटे (बिनविरोध)
🔹 अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) – जागा रिक्त
🔹 इतर मागास प्रवर्ग (महिला) – सौ. धनश्री दिपक पाटील (बिनविरोध)
🔹 अल्पसंख्यांक (सर्वसाधारण) – श्री. सय्यद मस्तान फकिरा (बिनविरोध)
🔹 विकलांग/दिव्यांग (सर्वसाधारण) – श्री. कृष्णा पांडुरंग खरात (बिनविरोध)
🔹 सर्वसाधारण महिला राखीव – सौ. रेखा अनिल चिकणे (121 मतांनी विजयी)
🔹 सर्वसाधारण – श्री. अनिल गेणू चिकणे (257 मतांनी विजयी)
🔹 सर्वसाधारण – श्री. श्रीकांत भगवान भोईर (181 मतांनी विजयी)
निवडणूक निर्णय अधिकारी अजय साबळे यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांना निवड प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमुळे शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



