आळेफाटा — उकडीचे धोंडे, पूरण पोळी, गोड आमरस, गावठी तूप, चटकदार सार, भात, कांदाभजी आणि पापड अशा सामिश्र मिष्टांन्नाचा आस्वाद घेत ४५ माजी वर्गमित्र- विद्यार्थ्यांची धोंडा पार्टी काल आळेफाटा येथील साईलिला गार्डन मंगल कार्यालयात रंगली. निमित्त होते ज्ञानमंदिर हायस्कूल आळे येथील दहावी १९७९ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या व्दितीय स्नेहसंमेलनाचे.
या माजी विद्यार्थ्यांचे पहिले स्नेहसंमेलन गेल्या वर्षी १ जूनला संपन्न झाले.म्हणून या संमेलनाचे आयोजनही काल ५ जूनला केले होते. योगायोगा म्हणजे भगवान विष्णूला समर्पित असलेला अधिक मासही सध्या सुरु आहे.याचे औचित्य साधून या दहावीच्या बॅचशी प्रथमपासून जोडले गेलेले ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन नेतादादा डोके, साईलिलाचे संचालक मुन्नाशेठ कुऱ्हाडे यांनी ही धोंडा पार्टी आयोजित केली होती.
माजी विद्यार्थ्याची पार्टी, तरुणांची पार्टी असे शब्द हल्ली पालकांना ऐकू आले की त्यांच्या छातीत धस्स होते.पण आपली संस्कृती,आपले मराठमोळे खाद्यपदार्थ, आपल्या संस्कृतीची मूल्ये विसरु नका.असा संदेश या धोंडा पार्टीतून महाविद्यालयीन तरुणांपर्यत पोहचला आहे.
या स्नेहसंमेलनास ज्ञानमंदिर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक गंगाराम गुंजाळ सर यांनी प्रत्यक्ष तर याच हायस्कूलचे इंग्रजीचे प्रख्यात शिक्षक यशवंत माळी यांनी मोबाईलवरून लक्षवेधी भाषण करुन माजी विद्यार्थ्यांची मने जिंकली.अशीच संमेलने यापुढेही तुम्ही विद्यार्थी आयोजित करीत जा.यामुळे तुमच्यातील गोडवा वाढेल. तुम्ही गुण्या गोविंदाने राहाल,असे प्रतिपादन गंगाराम गुंजाळ सर यांनी केले.
सोने आगीतून निघाले की ते अधिक तेजस्वी होते.तद्वत आपण सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, व्यवसाय यशस्वीपणे करुन उजळून निघाला आहात.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार झालात याचा मला मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन यशवंत माळी सर यांनी केले.
या स्नेहसंमेलनात दहावी १९७९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी जालिंदर जाधव यांचे अलिकडेच निधन झाले.त्यांना सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
माजी विद्यार्थी गिर्यारोहक विलासराव बनकर यांनी यशस्वीपणे जगातील सर्वात उंच असलेल्या माऊंट एव्हरेस्ट बेस अर्थात पायथ्यापर्यंत प्रवास यशस्वी केला.तसेच यापूर्वी १०८ वेळा त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीची १०८ वेळा परिक्रमा केली.तर नर्मदा परिक्रमा यशस्वी केल्याबद्दल माजी विद्यार्थी होणाजी गुंजाळ या दोघांचा सत्कार यावेळी नेताजीदादा डोके यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही झाला.यात रोजच्या धावपळीच्या मानवी जीवनात त्रिकाल संध्या नित्यनेमाने करणे आवश्यक असल्याचे सोपानराव तितर यांनी उत्तमरीत्या विशद केले.याशिवाय त्यांनी गुजराती भावगीत मारा जीवनने अर्चन बनावो (जीवन एक वरदान बनवा) हे गीत सादर करीत स्नेहसंमेलनात धमाल उडवून दिली. गिर्यारोहक विलासराव बनकर यांनी माऊंट एव्हरेस्ट बेसची सफर मोजक्या शब्दात यावेळी वर्णन केली. ह.भ.प. बाळकृष्ण कुऱ्हाडे, संजय शहा यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवांचे कथन केले.तर सुरेखा गणोरे काळे यांनी स्वरचित दोन कविता आपल्या मंजुळ आवाजात सादर करुन वाहव्वा मिळवली.इतरही माजी विद्यार्थ्यांनी यावेळी विविध हिंदी-मराठी गीते सादर करुन या सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली.शेवटी या स्नेहसंमेलनाची सांगता सुग्रास धोंडा पार्टीने झाली. प्रकृती बरी नसल्यामुळे याच हायस्कूलचे निवृत्त प्रा.मधुकर एरंडे सर हे या संमेलनास उपस्थित राहू शकले नाहीत.मात्र त्यांनी बेडवरून हृदयस्पर्शी शुभ संदेश पाठवून विद्यार्थ्यांची मने जिंकली
या स्नेहसंमेलनास विलासराव बनकर, सोपानराव तितर, सुरेश राहींज, पांडुरंग गडगे सर , शिवाजी भुजबळ, रवी गुंजाळ, ज्ञानेश्वर शिंदे, रवींद्र वाघोले सर ,रमेश फणसे, नाथा बामणे, वसंत पिंगळे, मंगल व-हाडी, मीना डोके, सुरेखा गणोरे – काळे , साधना अंगरकर- वाव्हळ , मीनाक्षी पाठक-मिसर, शरद जाधव,विलास जाधव, राजेंद्र गुंजाळ, पत्रकार नारायण जाधव, अशोक डावखर,अॅड मनोहर जोशी, संजय शहा, होणाजी गुंजाळ,ह.भ.प. बाळकृष्ण कुऱ्हाडे,पुरुषोत्तम साबळे, संजय जाधव,देवीदास वेल्हाळ, संजय कुऱ्हाडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.




