ताज्या बातम्या

धारावीतील रहिवाशांसाठी मोफत सरकारी प्रमाणित योग शिक्षक प्रशिक्षण कोर्स

मुंबई : मुंबईतील नामांकित योग संस्था न्यू एज योगा इन्स्टिट्यूट (NAYI) गेल्या ३१ वर्षांपासून योग प्रशिक्षण आणि आरोग्य जनजागृतीचे कार्य करत आहे. संस्थेच्या वतीने आता धारावीतील रहिवाशांसाठी विशेष मोफत सरकारी प्रमाणित योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत पात्र उमेदवारांना आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या योग सर्टिफिकेशन बोर्ड (YCB) मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा अभ्यासक्रम दहावी (एसएससी) उत्तीर्ण असलेल्या सर्व इच्छुकांसाठी खुला असून, विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण २०० तासांचे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रत्येक बॅचमध्ये सुमारे २० विद्यार्थ्यांचा समावेश असेल. आठवड्यातून तीन दिवस दुपारी १२.३० ते ४.३० या वेळेत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. वर्गादरम्यान २० मिनिटांचा विश्रांती कालावधी देखील असेल.
हे प्रशिक्षण महाराष्ट्र नेचर पार्क, धारावी बस डेपो समोर येथे घेण्यात येणार आहे. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग सर्टिफिकेशन बोर्ड (YCB), आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून सरकारी प्रमाणपत्र तसेच न्यू एज योगा इन्स्टिट्यूटचे पूर्णता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
योग शिक्षक म्हणून करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या तसेच आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या धारावीतील नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी इच्छुकांनी खालील लिंकद्वारे अर्ज भरावा, तसेच ही माहिती धारावीतील इतर इच्छुक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : धनंजय मो. ९३२०१७९३२०
न्यू एज योगा इन्स्टिट्यूट (NAYI)

Scroll to Top