ताज्या बातम्या
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेशअकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासाभिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाईकराड शहर पोलिसांची मोठी कारवाई; 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त, तिघे जेरबंद 18.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; वारुंजी फाट्यावर सापळा रचून छापा कारवाईमहिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागातील समन्वयाअभावी… राज्यातील “महिला सन्मान” योजनेपासून अनेक कर्तबगार महिला वंचित

महिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागातील समन्वयाअभावी… राज्यातील “महिला सन्मान” योजनेपासून अनेक कर्तबगार महिला वंचित

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी – खंडूराज गायकवाड)
राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, ग्रामविकास विभागाच्या अपेक्षित सहकार्याअभावी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
९ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक ग्रामपंचायत आणि गट ग्रामपंचायत क्षेत्रातून दोन कर्तबगार महिलांची निवड करून त्यांना दरवर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सन्मानित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करून त्यामध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत बरखास्त असल्यास प्रशासकांना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
यासाठी एक नियमावलीही तयार करण्यात आली होती. त्यामध्ये महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत स्तरावर हा पुरस्कार देण्यात यावा, असे नमूद करण्यात आले होते. या क्षेत्रात त्यांना किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. पुरस्कारप्राप्त महिला सात वर्षांनंतर या पुरस्कारासाठी पुन्हा अर्ज करू शकते. संबंधित पात्र महिलांमध्ये सामाजिक समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी. त्यांचा महिला अत्याचाराच्या कोणत्याही प्रकरणात सहभाग नसावा. असे निकष निश्चित करण्यात आले होते.
यासाठी ग्रामपंचायतीने दोन पात्र महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ तसेच रोख रक्कम म्हणून पाचशे रुपये द्यावेत, असे पुरस्काराचे स्वरूप निश्चित करण्यात आले होते. मात्र, राज्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच ग्रामपंचायतींनी या योजनेला गांभीर्याने घेतले. विशेष म्हणजे, बहुतांश जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खालच्या स्तरापर्यंत या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” योजनेची माहिती पोहोचविली नाही.
या संदर्भात एका ग्रामसेवकाने सांगितले की, “सदर योजना आम्ही २०२४ पर्यंत राबविली होती. मात्र, त्यानंतर वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे ही योजना बंद पडली.”
मात्र, २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत राज्यातील मोजक्याच ग्रामपंचायतींनी या आदेशाची अंमलबजावणी केली असून अनेक ठिकाणी शासन निर्णयाची दखलही घेण्यात आलेली नाही. राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून प्रत्येक ग्रामपंचायतीतून दोन महिलांचा सन्मान अपेक्षित धरल्यास सुमारे ५६ ते ५८ हजार कर्तबगार महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.
या संदर्भात “महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच”चे राज्य संघटक बिरू कोळेकर यांनी २६ मे २०२६ रोजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन या विषयाकडे लक्ष वेधले आहे. तसेच संबंधित विभागांतील समन्वयाअभावी झालेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या अजोड पराक्रमाने,न्यायबुद्धीने आणि कुशल प्रशासनाने जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सध्या देशभर त्रिशताब्दी साजरी करीत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ही ३१ मे २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती राज्यभर मोठ्या दिमाखात साजरी होणार आहे. अशा वेळी त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Scroll to Top