ताज्या बातम्या

स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात कराड आगाराला ५ लाखांचे पारितोषिक

कराड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात कराड आगाराने उल्लेखनीय कामगिरी करत पुणे विभागातील ‘अ’ वर्गात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल कराड आगाराला ५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
एस. टी. महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जून रोजी पुणे येथे होणाऱ्या समारंभात कराड आगाराचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख शर्मिष्ठा पोळ यांनी दिली.
प्रवाशांना स्वच्छ, सुंदर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने २०२५ पासून हे अभियान सुरू केले होते. पहिल्या वर्षी कराड आगाराचा समावेश ‘क’ वर्गात करण्यात आला होता. त्या वेळीही कराडने पुणे विभागात द्वितीय क्रमांक मिळवला होता. यंदा ‘अ’ वर्गात समावेश झाल्यानंतरही कराड आगाराने आपली गुणवत्ता कायम राखत पुन्हा द्वितीय क्रमांक मिळवला. २३ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान झालेल्या चौथ्या सर्वेक्षणात ही कामगिरी नोंदवण्यात आली.
अभियानांतर्गत कराड बसस्थानकात नियमित स्वच्छता, बोलक्या भिंती, सेल्फी पॉईंट, फुलझाडांच्या कुंड्या तसेच विविध प्रवासी सुविधा निर्माण करण्यात आल्या. या उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकसहभागातून विशेष प्रयत्न करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करूनही अनेक सुविधा उभारल्या.
आगारप्रमुख शर्मिष्ठा पोळ यांनी सांगितले की, अभियान संपले असले तरी कराड बसस्थानकातील स्वच्छता आणि सौंदर्य कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले जाणार आहेत. तसेच पुण्यातील गौरव समारंभात कराड आगारातील दोन कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

Scroll to Top