मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि परिसरातील ख्रिस्ती प्रार्थना स्थळांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते,उरणचे माजी नगरसेवक बबन कांबळे, अॅड. संजय वाघमारे आणि वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी शहराध्यक्ष मनीष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत चिंता व्यक्त केली. धर्मांतराच्या नावाखाली काही संघटित गटांकडून प्रार्थना स्थळांवर हल्ले केले जात असून पोलिसांकडून निष्पक्ष कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
“प्रार्थना करणे किंवा प्रभू येशू ख्रिस्तावर आस्था ठेवणे म्हणजे धर्मांतर नाही. धर्मांतर ही कायदेशीर प्रक्रिया असून ती जिल्हाधिकारी स्तरावर शपथपत्राद्वारे केली जाते,” असे बबन कांबळे यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयानेही आस्था ठेवणे म्हणजे धर्मांतर नसल्याचे निरीक्षण नोंदवले असल्याचा दावा त्यांनी केला.
वसई, मालाड, कणकवली आणि इतर ठिकाणी प्रार्थना सभांवर हल्ले झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणांत खोट्या तक्रारींवरून गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. “हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी आमच्याच लोकांवर जादूटोणा, धार्मिक भावना दुखावल्याचे गुन्हे दाखल केले जात आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग आणि गृह विभागाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून, गरज पडल्यास न्यायालयातही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ५ जून रोजी आझाद मैदान येथे निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.




