मुंबई : विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर येथे आज अनुसूचित जाती एकता समितीची राज्यव्यापी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, कर्मचारी संघटना, आंबेडकरी संघटना तसेच युवक प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण रद्द करणे, पदोन्नतीमधील आरक्षण लागू करणे आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सर्वानुमते महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, अनुसूचित जातींच्या एकतेसाठी व उपवर्गीकरणाच्या विरोधात “बीड ते मुंबई लॉंग मार्च” काढण्यात येणार आहे. हा लॉंग मार्च दि. १० जून २०२६ रोजी बीड शहरातून सुरू होणार असून दि. २६ जून २०२६ रोजी मुंबई येथे पोहोचणार आहे.
लॉंग मार्चचा मार्ग पुढीलप्रमाणे राहील :
बीड – मांजरसुंबा – पाटोदा – जामखेड – आष्टी – धानोरा – अहिल्यानगर – सुपा – शिरूर – भीमा कोरेगाव – पुणे – चिंचवड – तळेगाव दाभाडे – लोणावळा – खोपोली – पनवेल – ठाणे – मुंबई.
“चलो मंत्रालय…”
दि. २६ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर दहा लाख लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा व लॉंग मार्चचा भव्य समारोप होणार आहे.
या बैठकीस अरुण गाडे, दिनकर ओंकार, अशोक कांबळे, सुनिल वाकेकर, विश्वदिप करंजीकर, सिद्धार्थ शिनगारे, सचिन निकम, विजय वाहुळ, अनिल पळसपगर, रमेश गायकवाड, बलराज दाभाडे, कुणाल राऊत, अजय सरवदे, संदीप जाधव, प्रेम कांबळे, भिमराव गाडेकर, गौतम बावसकर, विलास गिऱ्हे, विनोद बनसोड, राहुल सोनवणे, सुशील तायडे, उमेश सरदार, धनंजय जाधव, हनुमंत पाटील, शेखर खैरनार, दादासाहेब शिंदे, सतिश गायकवाड, अभय शेलार, धम्मनंद जाधव, अविनाश गरुड, राहुल जाधव, संकेत खापर्डे तसेच रिपब्लिकन सेना, VBA, भीम आर्मी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे उपवर्गीकरण तात्काळ थांबवावे, पदोन्नतीमधील आरक्षण लागू करावे तसेच सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.




