कराड : येवती (ता. कराड) ग्रामपंचायतीतील कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामसेवक जयवंत लोहार यांनी प्राथमिक शाळा व अंगणवाडीसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक शेवाळे यांनी केला आहे.
संगनमत करून खोटी बिले सादर करण्यात आली असून शासन व ग्रामपंचायतीची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शैक्षणिक साहित्य खरेदी करताना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले गेले नाही. खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली नसून कार्यालयात जमा करण्यात आलेल्या पावत्या व प्रत्यक्ष साहित्य यांचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतही मोठ्या अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. अनेक ग्रामस्थांकडे पावत्या असतानाही ग्रामपंचायत दप्तरी त्यांची नोंद नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “आम्ही पुन्हा पैसे भरायचे का?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर ग्रामसभेत एकमताने चौकशीचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
“लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल,”
— प्रताप पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कराड
📨 या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामविकास मंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.




