ताज्या बातम्या

साहित्यिकांसोबत ग्रंथालयांचाही होणार सन्मान, ‘तात्या’ स्मृती पुरस्काराचे यंदा चौथे पर्व..!

तळमावले/वार्ताहर : ग्रामीण भागातील वाचन चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी आणि कसदार साहित्याचा सन्मान करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यच्या वतीने यंदाही राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागवण्यात येत आहेत. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून यंदा साहित्यिकांसोबतच आदर्श ग्रंथालयांनाही गौरविण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी केली आहे.
स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 75 हून अधिक साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सन 2025 व 2026 या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके स्वीकारली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कथासंग्रह, कविता, चारोळी, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेखन, चरित्र व आत्मचरित्र अशा सर्व साहित्य प्रकारांचा समावेश असेल. पुरस्कारासाठी निवडीसाठी एक स्वतंत्र तज्ज्ञ परीक्षक समिती नेमली असून, विजेत्यांना सन्मानपत्र आणि ग्रंथ देऊन गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
साहित्यासोबतच समाजातील वाचन संस्कृती जपणाऱ्या ग्रंथालयांच्या कार्याची दखल घेण्यासाठी यंदापासून स्व.राजाराम डाकवे (तात्या) स्मृती सर्वोत्कृष्ट वाचनालय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यासाठी इच्छुक ग्रंथालयांनी आपली ग्रंथसंपदा, सदस्य संख्या, डिजिटल सेवा आणि वर्षभरातील उपक्रमांची माहिती प्रस्तावाद्वारे सादर करणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी पुस्तकाच्या तीन प्रती, दोन फोटो आणि लेखकाचा अल्प परिचय गुरुवार दि. 30 जुलै, 2026 पर्यंत ‘आई-तात्या निवास, ज्ञानेश्वर कॉलनी, सैदापूर, ता.कराड, जि.सातारा या पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरियरने पाठवावेत. प्राप्त झालेल्या पुस्तकांपैकी एक प्रत स्व.राजाराम डाकवे सार्वजनिक वाचनालयाला, दुसरी प्रत ‘पुस्तकांचं झाड’ उपक्रमासाठी, तर तिसरी प्रत ग्रामीण वाचनालयांना भेट स्वरूपात दिली जाणार आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने यापूर्वी पुस्तकांचं झाड, तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धा आणि स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून साहित्यासाठी मोठे व्यासपीठ निर्माण केले आहे. या पुरस्कारांचे भव्य वितरण सोमवार दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी स्व. राजाराम डाकवे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणादिवशी होणार असून, जास्तीत जास्त साहित्यिक व ग्रंथालयांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Scroll to Top