ताज्या बातम्या

महालक्ष्मी सरस मध्ये अहिल्यानगरच्या मंगला वाकचौरे यांची कमाल; मडक्यातील लोणचं ४ दिवसांत ४० किलो विक्री, १,००० रुपये किलो दर*

मुंबई : उमेद अभियानाच्या माध्यमातून आयोजित महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये राज्यभरातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसाय, हस्तकला आणि खाद्यपदार्थांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मेळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावच्या मंगला संजीव वाकचौरे (वय ४० वर्षे) यांनी मडक्यातील पारंपरिक लोणच्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

२ मेपासून सुरू झालेल्या या मेळ्यात अवघ्या चार दिवसांत मंगला वाकचौरे यांनी ४० किलो लोणचं प्रति किलो १,००० रुपयांच्या दराने विक्री केली आहे. साडेचारशेहून अधिक स्टॉल्समधून त्यांच्या लोणच्यांचा स्टॉल हा सर्वाधिक महागड्या आणि तितकाच लोकप्रिय स्टॉल म्हणून ओळखला जात आहे.

मंगला वाकचौरे या गेली १० ते १५ वर्षे घरगुती पद्धतीने लोणचं बनवत होत्या, तर सुमारे अडीच वर्षांपासून त्यांनी याला व्यवसायाचे स्वरूप दिले. उमेद अभियानात सहभागी झाल्यानंतर त्यांना व्यवसाय वाढवण्याची दिशा मिळाली. या माध्यमातून त्यांना स्वतःचा ब्रँड तयार करणे, उत्पादनाची गुणवत्ता राखणे आणि बाजारपेठ कशी वाढवायची याचे प्रशिक्षण मिळाले.

त्यांच्या लोणच्यांची खासियत म्हणजे ते पूर्णपणे घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने मडक्यात तयार केले जाते. कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर केला जात नाही. केमिकलमुक्त (रसायनमुक्त) आंबे, घाण्यावर काढलेलं तेल आणि घरच्या घरी तयार केलेले मसाले यांचा वापर करून लोणचं तयार केलं जातं. कैरी व्यवस्थित वाळवूनच लोणचं तयार केलं जातं, त्यामुळे त्याची चव आणि टिकाऊपणा कायम राहतो.

त्यांच्या या मडक्यातील लोणच्यांना महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये मोठी मागणी मिळत असून, ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. सध्या त्यांच्या सोबत ४ महिला आणि २ पुरुष काम करत असून, या व्यवसायातून त्यांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

आज मंगला वाकचौरे यांच्या लोणच्यांची मागणी केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून, त्यांचे उत्पादन बेंगळुरूपर्यंत पोहोचले आहे. त्यांना दररोज ५० ते १०० किलोपर्यंत लोणच्यांच्या ऑर्डर्स मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

महालक्ष्मी सरस २०२६ मधील त्यांच्या या यशस्वी विक्रीमुळे पारंपरिक, घरगुती पद्धतीने बनवलेल्या उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंगला वाकचौरे यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Scroll to Top