नवी मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोपरखैरणे व घणसोली शाखेच्या संयुक्त विद्यमाने थोर कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कोपरखैरणे येथील ज्ञान विकास विद्यालयात भव्य ‘खुले कवी संमेलन’ शनिवारी २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल सौ. जयश्रीताई पी. सी. पाटील यांचा या कार्यक्रमात विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. यानंतर संस्कृत शिक्षिका राधा गानू यांनी सरस्वती वंदना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिला सबलीकरण क्षेत्रात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या सौ. जयश्रीताई पाटील यांना कोमसापच्या ज्येष्ठ कवयित्री दमयंती भोईर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना जयश्रीताई भावूक झाल्या. त्यांनी हा सन्मान स्वतःचा नसून नवी मुंबईतील सर्व कष्टकरी महिला भगिनींचा असल्याचे सांगत तो त्यांना अर्पण केला. काेकण मराठी साहित्य परिषदेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मोहन भोईर यांनी जयश्रीताईंच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचा इतिहास सांगून कोमसापाचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला तसेच कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबईमधील विविध शाखांच्या कार्यक्रमांचेदेखील कौतुक त्यांनी आपल्या भाषणात केले.
ज्ञानविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पी. सी. पाटील यांनी कोमसापच्या साहित्यिक उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेचे व्यासपीठ साहित्यिकांसाठी सदैव खुले राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी कोमसापचे कार्यवाह सुनील रानकर तसेच प्रेरणा पाटील, प्रशासकीय अधिकारी रामदास बिडवे, मुख्याध्यापक जगन्नाथ दळवी, पर्यवेक्षक राजाराम अहिराव, पर्यवेक्षिका प्रतिभा पाटील, माणिक दुपटे आणि बाल संस्कार मंदिरच्या शिक्षिका, कोमसापचे श्यामसुंदर गांवकर तसेच रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्याचा जागर आणि कवी संमेलन
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्यात आला. कवयित्री दमयंती भोईर यांनी सुर्वे यांच्या अपरिचित कवितांची ओळख करून दिली. त्यानंतर ‘आगरी कवितेचे बादशहा’ पुंडलिक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. या संमेलनात जितेंद्र लाड, अक्षता गोसावी, ऋतुजा गवस या निमंत्रित कवींसह लोमहर्ष भगत, लक्ष्मण माने आणि प्रकाश बागडे, मच्छिंद्र पाटील, सुरेश शिंदे, मीनाक्षी तांडेल, राजेंद्र नाईक, प्रकाश ठाकूर, रुपाली लटके, धनंजय पाटील, वैशाली घनाते, अनुकूल माळी, ज्योती सपकाळ, सुमित म्हात्रे यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उर्दू शायर इक्बाल कवारे यांनी आपल्या शेरोशायरीने कार्यक्रमात विशेष रंगत भरली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राम पाटील, प्रकाश बागडे, सुनील म्हात्रे, संतोष जाधव, मिलिंद सपकाळ, सुनील रानकर, किशोर पाटील आणि रघुनाथ पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी ओघवत्या भाषेत केले, तर कवी रामनाथ म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




