ताज्या बातम्या

पनवेलमधील सिडको जनसामान्यांच्या घरांसाठी लढा यशस्वी; १०% दरकपातीमुळे नागरिकांना दिलासा — विक्रांत पाटील

पनवेल(अमोल पाटील) : अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आयोजित कार्यक्रमात आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी झालेल्या संघर्षाचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी “आपण सर्व एक परिवार आहोत” ही भावना व्यक्त करत भविष्यातही एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले की, सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत होता. या प्रश्नावर केवळ भावनिक भूमिका न घेता तथ्य आणि अभ्यासाच्या आधारे शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अनेक बैठका, चर्चासत्रे आणि अधिवेशनातील मांडणी यामुळे अखेर शासनाला निर्णय घ्यावा लागला.
त्यांनी सांगितले की, सिडको प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे घरांच्या किमती अनावश्यक वाढल्या होत्या. तसेच जीएसटीच्या स्लॅबमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ओझे येत होते. या सर्व मुद्द्यांवर सखोल अभ्यास करून शासनासमोर मांडणी करण्यात आली. अखेर शासनाने सिडको घरांच्या किमतींमध्ये १० टक्के कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रत्येक कुटुंबाचे लाखो रुपये वाचणार असल्याचे त्यांनी नमूद केले. “हा विजय केवळ माझा नसून सर्व नागरिकांच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, घर मिळणे हा शेवट नसून आता खरी सुरुवात आहे. भविष्यात सिडको परिसरात राहायला आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या वेळी सर्वांनी एक परिवार म्हणून एकत्र राहून समस्या सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील , सुभाषजी कदम, तानाजी खंडागळे ,समीरजी कदम ,प्रशांतजी कदम ,देविदासजी खेडकर, राजकुमारजी पाटील, संदीप म्हात्रे आकाश पाटील, प्रदीप देशमुखजी ,नगरसेविका स्नेहल पाटील ढमाले, मोहिनी विक्रांत पाटील विविध मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लढ्याचे कौतुक केले.
शेवटी, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देत पाटील यांनी “आपली प्रगती अखंड वाढत राहो आणि प्रत्येकाचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होवो” अशी मनोकामना व्यक्त केली.

Scroll to Top