सातारा

(अजित जगताप): सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी सातारा दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त सातारा शहरात बॅनरबाजी लावताना उपमुख्यमंत्री शिंदे हे पालकमंत्री देसाई यांना हात जोडल्याचा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅनर लावण्यात आला होता. परंतु, हा बॅनर तातडीने काढल्यामुळे तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा दौऱ्यावर येतात. त्यावेळेला शिवसैनिक कमी पण पोलीस व अधिकारी जास्त त्याहीपेक्षा बॅनर जास्त असतात अशी नेहमीच चर्चा होते. सध्या मोठ्या प्रमाणात सातारा शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सातारा नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बॅनरबाजी केलेली आहे. बरोबर महिन्याभरापूर्वी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यामुळे सातारा महाराष्ट्रभर गाजला होता. त्यानंतर बरोबर एक महिन्याने आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या या फुकटच्या बॅनरबाजीने सातारा नगरपालिकेचा कर बुडला आहे. परंतु, बुडत्याचा पाय खोलात असल्यामुळे याबाबत कारवाई होत नाही. याचाही अनेकदा अनुभव सातारकर कडक उन्हाळ्यात घेत आहेत. त्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सध्या प्रश्न बॅनरचा कर भरला की नाही? हा नसून बॅनरबाजी वरील फोटोच्या पोझिशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर वीस जागा निवडून दाखवले आहेत. महायुतीतील राष्ट्रवादीला सोबत घेऊन राष्ट्रवादीने १५ जागा जिंकल्या आणि काँग्रेस व शेतकरी संघटना अशा दोन जिल्हा परिषद सदस्यांनी सदस्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी युतीला पाठिंबा दिला होता. तरीही भाजपने शासकीय यंत्रणा व पोलिसांच्या मदतीने सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता बळकवली होती. ग्रामीण भाषेत जावळीचे काही मतदार सांगतात की, सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा भाजपने अपहरण केले आहे. त्यांना जनतेला जाब द्यावा लागेल. एकट्या पालकमंत्री देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली होती पण शिवसेना पदाधिकारी यांनी मौन धारण केले होते. अशी सुद्धा टीका झाली आहे. याबाबत सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे साताऱ्यातील गांधी मैदानावर काय बोलणार ?याकडे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना नेते व उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना हात जोडल्याच्या बॅनरबाजी मुळे असा बॅनर का लावला? भाजपला रोखून धरण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आक्रमक झाले म्हणून ही पोझिशन बॅनर मधून दिसली की, महायुतीत राहून भाजपच्या विरोधात रान उठवले म्हणून हात जोडले का? अशी आता चर्चा रंगू लागलेली आहे. सदर बॅनरबाजीमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतल्यामुळे अखेर हा बॅनर उतरवण्यात आला. घाई गडबडीने व स्वतःची छबी दिसण्यासाठी केलेला प्रताप हा अंगलट आल्याचे बोलले जात आहे. शेवटी सर्वांनाच व्यक्ती स्वतंत्र आहे. व्यक्ती स्वतंत्र म्हणजे स्वराचार नाही. काही बंधने पाळली जातात. याचा आता भान न राखल्यास त्याचा शिवसेनेला फटका बसू शकतो. सध्या सातारा शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा नाट्य हे कशामुळे घडले आहे? याची सुद्धा बातमी आता लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यापूर्वीच या बॅनरने बुंद से गयी व हौद से नही आती.. याची प्रचिती आलेली आहे. दरम्यान याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची सत्य भूमिका समजू शकली नाही. _________________________ फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा बॅनर काढण्यात आला. (छाया — अजित जगताप सातारा)




