ताज्या बातम्या

संपूर्ण भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शतकानू शतके ऋणी राहील – माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन

मुंबई : स्वातंत्र्य, समता आणि बंधुते बरोबरच भारतीय समाज एकात्म राहिला पाहिजे हा दृढ निश्चयी विचार मांडल्यामुळे, संपूर्ण भारत देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकरांचा शतकानू शतके ऋणी राहील असे माजी खासदार व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी प्रतिपादन केले. मंगळवारी जोगेश्वरी, केवणीपाडा येथे बौद्धजन पंचायत समिति शाखा क्र. १८८ व महिला मंडळ आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार स्नेहलता स्वामी, ज्येष्ठ समाजसेवक सुनील ढेंगळे, नगरसेवक विठ्ठल बंदेरी, विवेक विचार मंचचे मुंबई महानगर संयोजक व पंचायत समितीचे अध्यक्ष जयवंत तांबे, सचिव योगेश कांबळे, उपाध्यक्ष अशोक कदम उपस्थित होते.
माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आपल्या भाषणात, समाजात शतखंड विभाजनाची बीजे पेरली गेलेली असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं भांडवल केलं नाही; विषमतेचे चटके बसले, मनात चीड, वेदना व अंगार होता तरी त्यांनी अत्यंत सामंजस्य व संतुलित भूमिका घेतली. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मानवी मूल्य त्यांनी फ्रेंच क्रांतीतून घेतलेले नसून ते बुद्धाच्या विचार सरणीतून घेतलेले आहेत असे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, बुद्ध मत स्वीकारले तेव्हाचे डॉ. बाबासाहेबांचे एक उत्तम विधान आहे. ते म्हणतात “मी खोली सोडलेली आहे; घर सोडलेले नाही.” एकात्मता, सामाजिक न्याय, समता, समरसता या सर्व विचारांची गंगोत्री म्हणजे डॉ. बाबासाहेब आहेत. त्यांच्या तेजस्वी चरित्रातून प्रेरणा घेऊन, त्यांचा विचारांचा व कार्याचा प्रकाश घरा घरात पोहचविणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीमुक्तीचे खरे प्रणेते आहेत; प्रसूती रजा, समान काम-समान वेतन या सारखे त्यांनी स्त्रियांसाठी दिलेले अनेक अनमोल योगदान विशद करून, महिला उत्थानासाठी असलेले हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी सांगितले.
काळाराम मंदिराच्या आंदोलनाचा संदर्भ देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक शक्ति भडकविण्याचा प्रयत्न करीत असताना देखील त्यांनी अत्यंत संयमाने सत्याग्रह व आंदोलने केली. आपण संविधानाचा आधार घेऊन समाजाचा विकास साधूया असे ज्येष्ठ समाजसेवक सुनील ढेंगळे यांनी सांगितले.
जयंती कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर मराठी वाद्यवृंदाने झाली. सूत्रसंचालन तृप्ती पवार व पूजा जाधव यांनी केले; तर आभार प्रदर्शन जयवंत तांबे यांनी केले. आजूबाजूच्या परिसरातील महिला, पुरुष, तरुण, तरुणी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपथित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव जाधव, उदय गमरे, विनोद मोहिते, जयवंत जाधव, अपर्णा कदम, योजना कांबळे, आशाताई जाधव, ज्योती सकपाळ, माधुरी तांबे यांनी परिश्रम घेतले.

Scroll to Top