ताज्या बातम्या

नवी मुंबई महापालिकेची हिवताप/डेंग्यू नियंत्रण मोहीम जोमात – नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक

नवी मुंबई : पावसाळ्याच्या आगमनामुळे डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढत असतानाच, नवी मुंबई महानगरपालिका (नमुंमपा) आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा धडाका सुरू केला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी आणि डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेमार्फत विशेष जनजागृती शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रांतर्गत आठवड्यातून एकदा हिवताप/डेंग्यू जनजागृती शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत 25 एप्रिल ते 12 जून 2025 या कालावधीत एकूण 156 शिबिरे आयोजित करण्यात आली असून, यामध्ये 56,355 नागरिकांनी सहभाग घेतला असून 3,945 रक्तनमुने तपासणीसाठी घेतले गेले आहेत.

नियमित उपाययोजना:

महापालिकेमार्फत आठवड्याच्या कार्यक्रमांतर्गत खालील उपाययोजना राबवण्यात येत आहेत:

  • डास/अळी नाशक फवारणी
  • बंद गटारांमध्ये रासायनिक धुरीकरण
  • घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणी
  • तापाच्या रुग्णांभोवती 100 घरांमध्ये प्रतिबंधात्मक फवारणी व रक्तनमुने संकलन
  • मोफत ताप तपासणी आणि वैद्यकीय उपचार

सद्यस्थितीतील आकडेवारी:

1 जानेवारी 2025 ते 6 जून 2025 दरम्यान, 68106 रक्तनमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हिवताप रुग्ण आणि 111 संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. मात्र अद्याप एकही डेंग्यू रुग्णाचा रिपोर्ट सकारात्मक आलेला नाही.

नागरिकांनी पाळावयाच्या सूचना:

  • उघड्या ड्रम्सना झाकण लावणे
  • गॅलरी, गच्चीवरील भंगार साहित्य नष्ट करणे
  • कुंड्यांखालील ट्रे व फुलदाण्यांतील पाणी आठवड्यातून एकदा बदलणे
  • ड्रम, टाक्या व भांडी कोरडी ठेवणे
  • परिसरात पाणी साचू न देणे
  • मच्छरदाणीचा वापर करणे
  • ताप आल्यास महापालिकेच्या रुग्णालयात मोफत तपासणी करून घेणे

महापालिकेच्या या मोहिमेस जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, डासोत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. “भंगार साहित्य असेल जर घराच्या परिसरात, पाण्यात डास जन्म घेतील आपल्याच घरात” या संकल्पनेतून नागरिकांनी स्वच्छता राखून आरोग्य रक्षणात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

Scroll to Top