Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेश@ ३१ जुलै @देशातील पहिला मोबाईल कॉल& ३१ जुलै च्या आशा अनेक...

@ ३१ जुलै @देशातील पहिला मोबाईल कॉल& ३१ जुलै च्या आशा अनेक महत्वपूर्ण घटना

विशेष लेख : ३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस. या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री कॉम्रेड ज्योती बसू यांनी कोलकातातील रायटर्स बिल्डींग मधून दिल्लीतील संचार भवन मध्ये असलेले केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना देशातील पहिला मोबाईल कॉल केला. कोलकाता शहराला देशातील पहिली मोबाईल नेटवर्क सिटी करण्यासाठी ज्योति बसू यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी करून दाखवले. देशातील सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल २३ वर्षे सलग मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देखील कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावावर आहे. त्यासोबतच देशात एखाद्या राज्यात सलग ३४ वर्षे सत्ता असण्याचा विक्रम पश्चिम बंगाल मध्ये माकप प्रणित डाव्या आघाडीच्या नावे आहे. तसेच देशातील मोबाईल क्रांतीची सुरुवातच माकप नेते कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावे आहे. म्हणून ३१ जुलै हा भारतातील मोबाईल क्रांतीचा ऐतिहासिक दिवस आहे. लाल सलाम कॉम्रेड ज्योती बसू !

@ ३१ जुलै @
‘प्रेम रोग’ चित्रपट प्रदर्शित

राज कपूर यांचा ‘प्रेम रोग’ हा चित्रपट ३१ जुलै १९८२ रोजी प्रदर्शित झाला. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात राज कपूर खऱ्या अर्थाने ‘सपनों का सौदागर’ होते. त्यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून रसिकांना स्वप्न दाखवली, स्वप्न दिली. इथल्या सामन्यांच्या जीवनात प्रेमाचा अर्थ समजावून सांगितला. त्यामुळे राजचे प्रेमपट हे सामान्यांना आपलेसे वाटतात. इथल्या कॉमन मन च्या आयुष्यातील प्रेम दाखवताना ते अर्थातच चाकालेताच्या वेष्टनात गुंडाळलेले गुडी गुडी प्रेम नसायचे या प्रेमाला सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक दु:खाची जाणीव असायाची. त्या मुळे या प्रेमकथा इथल्या अस्सल मातीतल्या वाटायच्या. श्री ४२० असेल, आह असेल, अनाडी असेल किंवा आवारा असेल प्रत्येक ठिकाणाचा राज आणि त्याची प्रेयसी तुम्हाला तुमच्या आमच्यातील एक वाटते. त्या मुळे आर.के. चे सिनेमे प्रेक्षक स्वत: सोबत को रीलेट करत आणि त्याना ते जास्त अपील करत. आज आपण आर.के. च्या एका वेगळ्या चित्रपटाची चर्चा करणार आहोत. मला राज कपूर यांचे या बाबतीत खूप कौतुक करावसं वाटतं ते असं की चाळीसच्या दशकातील सामाजिक विषयाला घेऊन त्यांनी ऐंशीच्या दशकात एक चित्रपट निर्माण केला आणि तो ‘सुपरहिट’ करून दाखवला. बालविवाह, विधवा विवाह, विधवांचे होणारे कौटुंबिक छळ हा खरंतर स्वातंत्र्य पूर्वीच्या काळातील समस्येचा विषय. पण राज कपूर यांनी १९८२ साली ‘प्रेम रोग’ या चित्रपटातून याच ज्वलंत सामाजिक विषयाला वर्तमान काळात आणून रसिकांच्या पुढे पेश केले. ‘प्रेम रोग’ या चित्रपटाला राज कपूरचा ‘मिडास टच’ इतका जबरदस्त होता की, हे कथानक जुनं असलं तरी; कालबाह्य अजिबात वाटलं नाही. राज कपूर साठी किंबहुना आर.के. फिल्मसाठी या चित्रपटाला यश मिळणं खूप महत्त्वाचं होतं कारण यापूर्वी चा त्यांचा चित्रपट ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा सिनेमा वेगळ्याच’ कारणाने गाजल्यामुळे राज कपूरची दिग्दर्शनाची पकड ढिली होत आहे की काय असा समज रसिका मध्ये पसरला होता. पण राज कपूरने या सर्व शंका-कुशंकांनी खोटे ठरवत ‘प्रेम रोग’ या चित्रपटाला दणदणीत यश मिळवून दिले. राज कपूरचा हा करिष्मा अफलातून होता. ‘प्रेम रोग’ या चित्रपटाची कथा राज कपूर यांना लेखिका कामना चंद्रा यांनी ऐकवली होती. हा काळ साधारणता १९७७-७८ चा होता. आर.के. चा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट त्या वेळी फ्लोअर वर होता. राज यांना ही कथा खूपच आवडली आणि त्यांनी ताबडतोब जैनेंद्र जैन यांना या कथेची पटकथा आणि संवाद लिहिण्यासाठी बोलावले. त्यावेळी राज कपूर यांनी जैनेंद्र जैन यांना या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तुम्हाला करायचे आहे असे सांगितले होते. ते खुश झाले आणि जोमाने कामाला लागले. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाची नायिका झीनत अमान होती परंतु तिचा बालपणीचा रोल पद्मिनी कोल्हापुरे हिने केला होता.

राजकपूर यांच्या डोक्यात त्याच वेळी आपल्या आगामी ‘प्रेम रोग’ साठी पद्मिनी कोल्हापुरे ला नायिका म्हणून घेण्याचे ठरवले होते. ‘सत्यम शिवम सुंदरम’ च्यावेळी पद्मिनी कोल्हापुरे फक्त बारा वर्षाची होती. खरंतर पद्मिनी कोल्हापुरे आणि ऋषी कपूर यांचा हा पहिला चित्रपट होता. नासिर हुसेन यांचा ‘जमाने को दिखाना है’ हा चित्रपट चांगला असून देखील बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला. या दोन्ही चित्रपटाची सुरुवात साधारणतः एकाच वेळी झाली होती, पण नासिर हुसेन यांना चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करण्याची घाई झाल्याने हा सिनेमा आधी प्रदर्शित झाला. जर कदाचित ‘प्रेम रोग’ नंतर ‘जमाने को दिखाना है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर कदाचित यशस्वी देखील झाला आला. ‘प्रेम रोग’ या चित्रपटाचे छायाचित्रण आर.के. चे जुने जाणते सिनेमॅटोग्राफर राघू कर्माकार (ज्यांनी ‘जिस देश मे गंगा बहती है’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता) होते. चित्रपटाचे संकलन राज कपूर यांनी स्वतः केले होते. या चित्रपटात शम्मी कपूर, नंदा, तनुजा, ऋषी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, बिंदू, ओमप्रकाश, विजयेंद्र घाटगे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची गाणी पं. नरेन्द्र शर्मा, अमीर कजलबाश आणि संतोष आनंद यांनी लिहिली होती तर चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. या चित्रपटात एकूण सहा गाणी होती आणि ही गाणी लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अन्वर आणि सुधा मल्होत्रा यांनी गायली होती. खरं तर या चित्रपटातील सर्व गाणी अन्वर गाणार होते परंतु त्यांनी अधिक मानधन मागितल्यामुळे राजकपूर त्यांच्यावर नाराज झाले आणि केवळ एका गाण्या नंतर त्यांची बोळवण करण्यात आली आणि उरलेली सर्व गाणी सुरेश वाडकर यांच्या स्वरात स्वरबद्ध करण्यात आली.

या चित्रपटात जुन्या जमान्यातील एक गायिका सुधा मल्होत्रा यांचा स्वर खूप वर्षा नंतर ऐकायला मिळाला होता, हे गाणे सुधा मल्होत्रा यांनी अन्वर यांच्या सोबत गायले होते. गाण्याचे बोल होते ‘ये प्यार था या कुछ और था’. या चित्रपटातील ‘भंवरे ने खिलाया फूल फुल को ले गया राज कुंवर‘ हे गाणे पं. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले होते. तर ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’ हे गाणे अमीर कजलबाश यांनी लिहिले होते. उर्वरित ‘मुहोब्बत है क्या चीज हमको बतावो, मै हू प्रेम रोगी, ये प्यार था या कुछ और था, आणि ‘ये गलीया ये चौबारा यहां आना न दोबारा’ हि चारही गाणी संतोष आनंद यांच्या लेखणीतून उतरलेली होती. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या यादीत बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये या चित्रपटाचा दुसरा क्रमांक होता. या चित्रपटाचे एकूण बजेट दोन कोटी होते आणि या चित्रपटाने साडेसहा कोटीचा बिजनेस केला होता. याचवर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता सुभाष घई यांचा ‘विधाता’. योगायोगाने या चित्रपटाची नायिका देखील पद्मिनी कोल्हापुरी होती. दुसऱ्या क्रमांकावर ‘प्रेमरोग’ हा चित्रपट होता तर तिसऱ्या क्रमांकावर प्रकाश मेहरा यांचा ‘नमक हलाल’ होता. याचवर्षी ‘डिस्को डान्सर, सनम तेरी कसम, नदिया के पार, शक्ती, निकाह, राजपूत, सत्ते पे सत्ता’ हे चित्रपट लोकप्रिय ठरले होते.

आर.के. च्या चित्रपटातील नायिकांना राज मोठ्या ग्लॅकमरस बोल्ड पद्धतीने रसिकांपुढे आणत असे परंतु या चित्रपटाचे कथानकच वेगळे असल्यामुळे चित्रपटातील नायिका पद्मिनी कोल्हापुरे ला अंगभर कपड्यात दाखवावे लागले. त्याची उणीव या चित्रपटात अभिनेत्री बिंदू ने काही प्रमाणात पूर्ण केली होती. चित्रपटाची कथा कामना चंद्रा यांनी लिहिली होती. या कामना चंद्रा यांनी पुढे ‘चांदनी’, ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचे कथानक लिहिले. (कामना चंद्रा यांचे चिरंजीव विक्रम चंद्रा आजच्या काळात मोठे नाव आहे. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘सिक्रेट गेम्स’ या वेबसिरीज च्या दोन्ही सिजन ला प्रचंड लोकप्रियता मिळाली.) या चित्रपटाची नायिका जरी पद्मिनी कोल्हापुरे असली तरी या चित्रपटासाठी मधू कपूर या अभिनेत्रीचा देखील विचार झाला होता, पण मधू कपूर त्यावेळी राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटात काम करीत असल्यामुळे आणि या संस्थेशी करार बध्द असल्याने तिची संधी गेली. पद्मिनी कोल्हापुरी ने मात्र या चित्रपटात अप्रतिम भूमिका केली होती हे मान्य करावेच लागेल. शम्मी कपूर, तनुजा आणि नंदा पहिल्यांदाच राज कपूर यांच्या दिग्दर्शनात काम करीत होते. राजकपूर आणि शम्मी कपूर यांनी यापूर्वी ‘चार दिल चार राहे’ (१९५९) मध्ये एकत्र अभिनय केला होता.

‘प्रेम रोग’ या चित्रपटाचे कथानक काहीसे जुने असले तरी राज कपूरने त्याला अजिबात जुनाट होऊ दिले नाही. या चित्रपटात दुहेरी संघर्ष होता. एक संघर्ष होता स्त्री-स्वातंत्र्याचा, तिच्या हक्कांचा, तिच्या जाणिवांचा.आणि दुसरा संघर्ष होता सामाजिक विषमतेचा. या दोन्ही प्रश्नांना राज कपूरने मनोरंजनाच्या वेष्टणात इतक्या चांगल्या पद्धतीने गुंफले होते की चित्रपट कथानकाची थीम जरी जुनी असली तरी ती वर्तमान पिढीला प्रचंड आवडून गेली. ठाकूर खानदानातील लाडात वाढलेली मनोरमा (पद्मिनी कोल्हापुरे) अल्लड वयाची असते. प्यार, मोहब्बत वगैरे तिला काही काही माहीत नसतं. त्या गावात असलेल्या पुजाऱ्याचा (ओम प्रकाश) भाचा देवधर (ऋषी कपूर) तिचा बालपणीचा मित्र असतो. देवधर ला ठाकूरने (शम्मी कपूर) ने आर्थिक मदत करून शहरात शिक्षणासाठी पाठवलेले असते. शिक्षण घेऊन देवधर जेव्हा गावात येतो तेव्हा मनोरमाने तारुण्यात पदार्पण केलेले असते. देवधर तिच्याकडे आकर्षित होतो. मनोरमा अजूनही अल्लड असते. ती देवधर सोबत पूर्वी प्रमाणेच दंगामस्ती करते. त्याच्या हाताचा चावा घेते. देवधर तिच्यावर मनातल्या मनात एक तर्फी प्रेम करत असतो. त्याला स्वत:च्या सामाजिक परिस्थितीची जाणीव असते. याच काळात मनोरमा साठी ठाकूर घराण्याला तोलामोलाचे असलेले कुमार नरेंद्र प्रताप सिंग (विजयेंद्र घाडगे) यांचे स्थळ येते. कुंडली जमत नसताना ही मुद्दाम हून ती जमवली जाते. पद्मिनी आणि विजयेंद्र यांचे लग्न ठरते. आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणी ला विसरत देवधर मोठ्या मनाने त्या लग्नात सामील होतो. पण लग्ना नंतर दुसऱ्याच दिवशी विजेयेंद्र घाडगे यांच्या कारचा एक्सीडेंट होतो आणि त्यात त्याचे निधन होते. एका दिवसात पद्मिनी कोल्हापुरेचे वैवाहिक आयुष्य संपते आणि ती विधवा होते. मग सुरू होतात तिच्या आयुष्यातील छळाचे अध्याय. तिला पांढरे कपडे घालायला मजबूर केले जाते. सौंदर्यप्रसाधनं तिच्या पासून काढून घेतली जातात. आणि सर्वात कहर म्हणजे तिचे केस कापायला न्हाव्याला बोलावले जाते. विधवा स्त्रिया वरील हा पराकोटीचा अन्याय असतो. कुणालाच हा मान्य नसतो, पण जुन्या परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वजण मूक संमती देत असतात. मनोरमा ची आई छोटी मां (नंदा) हिला आपल्या मुलीचे दुःख कळत असतं. आपल्या हसऱ्या खेळत्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी ती पाहत असते. तिच्या नजरेने देवधर आणि मनोरमा यांच्या न उमललेल्या प्रेमाच्या अंकुराची देखील माहिती असते. तिकडे सासरी मनोरमा च्या कौटुंबिक छळाची मालिका चालूच राहते आणि एका रात्री तिच्यावर तिचा मोठा दीर अतिप्रसंग करायला पुढे येतो. आता मनोरमा पुरती हादरते आणि ती माहेरी परत येते.

इकडे देवधर पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. आता संघर्ष मोठा बाका झालेला असतो कारण मनोरमा आता पूर्वीची राहिलेली नसते तर ती आता एक विधवा असते. तिच्या लिंगपिसाट दिराकडून वारंवार तिला पुन्हा बोलावले जाते, पण मनोरमाची आई तिच्या बाजूने ठाम उभी राहते. कोवळ्या वयातील वैधव्य आणि नव्याने फुटलेला प्रेमाचा अंकुर या प्रश्नाच्या गुंत्यात मनोरमा पुरती अडकून जाते. काय निर्णय घ्यावा याबाबत ती प्रचंड गोंधळलेली असते. पण शेवट गोड होतो. देवधर मोठा संघर्ष करून मनोरमाला आपली करतो. दोन प्रेमी जीव एकत्र येतात. या चित्रपटातील ‘भंवरे ने खिलाया फूल’ हे गाणे राज कपूर यांनी ॲम्स्टरडॅम च्या ट्यूलिप गार्डन मध्ये चित्रित केले होते. त्यावर्षी यश चोप्रांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे अमिताभ आणि रेखा चे गाणे देखील ॲम्स्टरडॅम ला चित्रित केले होते. त्याची त्या काळात फिल्मी वर्तुळात मोठी चर्चा होत होती. राज कपूर यांनी देखील आपल्या ‘प्रेम रोग’ मधील ‘भंवरे ने खिलाया फूल’ हे गाणे तिकडे चित्रित करायचे ठरवले. राज कपूर यांचे चिरंजीव रणधीर कपूर यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यांच्या मते आपल्या चित्रपटाचा जॉनर वेगळा असल्याने तिकडे चित्रित करायची अजिबात आवश्यकता नाही. परंतु राज कपूर यांनी हट्टाने ते गाणे तिकडे चित्रीत केले. तब्बल नऊ दिवस या गाण्याचे चित्रीकरण तेथे चालू होते.

राजकपूर यांनी ‘आपण स्वप्न विकायला हवीत. त्यासाठी कुठलीही तडजोड करता कामा नये’ असे सांगितले. या सिनेमाचे प्रॉडक्शन पूर्णतः रणधीर कपूर हाताळत होता तर राज कपूर यांचा तिसरा मुलगा राजीव कपूर दिग्दर्शना मध्ये राज कपूर यांना मदत करत होता. राजीव कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचे सूत या चित्रपटाच्या सेटवर जुळले होते, परंतु राज कपूर यांनी दोघांनाही तंबी दिली आणि पद्मिनी कोल्हापुरी ला तर चक्क ‘जर पुन्हा तु राजीव कपूर सोबत दिसली तर या चित्रपटातून तुला काढून टाकण्यात येईल’ असा दम दिला. आणि दोघांच्या प्रेम कहाणीला पूर्णविराम मिळाला. अभिनेत्री नंदा शम्मी कपूर पहिल्यांदाच आर.के. फिल्म मध्ये काम करत होते. नंदा आणि पद्मिनी कोल्हापुरी या दोन्ही मराठी अभिनेत्रींनी यापूर्वी १९८१ साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात आई आणि मुलीची भूमिका केली होती. यानंतर १९८३ मध्ये आलेल्या यश चोप्रांच्या ‘मशाल’ या चित्रपटात तिसऱ्यांदा या दोघींनी आई आणि मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच ऋषी कपूर आणि सुषमा सेठ यांनी एकत्र भूमिका केली होती. त्यानंतर या दोघांनी ‘चांदनी, बोल राधा बोल, दिवाना, स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटात आई आणि मुलाची भूमिका केली. नंदा यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी राजकपूर यांनी त्या पूर्वी आशा पारेख आणि सिमी गरेवाल यांना/देखील विचारले होते पण दोघींनी देखील आईची भूमिका करायला नकार दिल्याने ही भूमिका नंदा यांच्या वाट्याला आली.

यावर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्ड्स मध्ये तब्बल १० कॅटेगिरी या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. त्यापैकी राजकपूर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पद्मिनी कोल्हापुरे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, संतोष आनंद सर्वोत्कृष्ट गीतकार (मोहब्बत है क्या चीज हमको बताओ) आणि राज कपूर सर्वोत्कृष्ट संकलन हे पुरस्कार मिळाले. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (ऋषी कपूर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (नंदा), सर्वोत्कृष्ट कथा (कामना चंद्रा), सर्वोत्कृष्ट संगीतकार (लक्ष्मीकांत प्यारेलाल), सर्वोत्कृष्ट गीतकार अमीर कजलबाश (मेरी किस्मत मे तू नही शायद) आणि सर्वोत्कृष्ट गायक सुरेश वाडकर (मेरी किस्मत में तू नहीं शायद) यांना फिल्मफेअर चे नामांकन मिळाले होते. सर्वात कमी वयात सर्वोत्कृष्ट नायिकेचा फिल्मफेयर पुरस्कार मिळविणारी पद्मिनी कोल्हापुरे हि सर्वात कमी वयाची अभिनेत्री होती. (बॉबी च्या वेळी डिम्पलला देखील याच वयात पुरस्कार मिळाला होता पण तो विभागून होता जया भादुरी सोबत. जयाला ‘अभिमान’ साठी पुरस्कार होता.) तर हि होती ‘प्रेमरोग’ या सिनेमाच्या मेकिंग ची कहाणी.
‘कॉस्मोपोलिटन या मासिकाने भारतातील सर्वोत्कृष्ट दहा रोमांटिक चित्रपटात ‘प्रेम रोग’ समावेश केला आहे.

❀ ३१ जुलै ❀
शास्त्रज्ञ दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये जन्मदिन

जन्म – ३१ जुलै १८८७ (देवगड,रत्नागिरी)
स्मृती – २६ फेब्रुवारी १९७१

दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये यांचा जन्म मणचे, ता.देवगड, जि.रत्नागिरी येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच एका मागोमाग आई आणि वडील निधन पावल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण हावनूर, जि. धारवाड येथे झाले. नंतरचे शिक्षण नाशिक व मुंबई येथे झाले. १९०५ साली मॅट्रिक झाल्यावर गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हणूनच त्यांचा एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश झाला. पुढच्याच वर्षी त्यांनी फर्गसन महाविद्यालयात प्रवेश मिळवला. १९०९ साली बी.एस्सी. आणि १९११ साली रसायन हा विषय घेऊन एम.ए. (सायन्स) ही पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने संपादन केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या ओढग्रस्त असताना लिमये यांनी हे यश मिळवले. त्यांचे सगळे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले, इतकी गुणवत्ता त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान दाखवली होती. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा लोभ त्यांना मिळाला. त्यामध्ये एल्फिन्स्टनचे प्राचार्य शार्प यांचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी लिमयांना नोकरीही देऊ केली होती, पण ती त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली. प्राचार्य कानिटकरांनी स्थापन केलेल्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कानिटकरांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केले. नंतर तिथे ते स्वकर्तृत्वाने संचालक झाले. औद्योगिक दृष्टीने उपयोगी पडेल असे काम लिमयांनी सुरू केले. त्यामध्ये हिरडा व तरवड यांचे अर्क काढून त्याचा कातडी कमावण्यासाठी उपयोग, लोखंड, मँगनीज, बॉक्साईट इत्यादी खनिजांचे रासायनिक विश्‍लेषण, काचेवर पारा चढवणे, बिलोरी काचेचे विविधरंगी गोळे बनवणे, पेनची, मुद्रणालयाची, कापडावर छापायची अशी वेगवेगळ्या प्रकारची शाई बनवणे, असे नानाविध प्रकारचे प्रयोग करून ते यशस्विरीत्या पार पाडले.

गोंद, साबण, घासकामाचा कागद इत्यादीचे उत्पादन केले, तर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सूचनेनुसार सिमेंट टेस्टिंगचे कामही केले. निंबोळी, उंडी, करंजेल या वनस्पतींवर त्यांनी संशोधन केले. त्यांना करंजेल मध्ये रवाळ स्फटिकरूप आणि अल्कोहोलमध्ये विरघळणारा फ्लॅव्होन जातीचा नवीन पदार्थ, तेलाच्या साक्यात मिळाला. त्याला ‘करंजिन’ असे नाव लिमयांनी दिले. रसोद प्रक्रिया, रंजोर्व प्रक्रिया, निधोन पद्धती अश वेगवेगळ्या पद्धतींना समर्पक नावे दिली. पाश्चात्त्य संशोधकांनीही लिमयांनी दिलेली नावे वापरली. यावरून त्यांच्या संशोधनाचे आणि प्रक्रियांचे महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक बळाची कमतरता असताना त्यांनी असे महत्त्वाचे संशोधन करता येते, हे स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले. अडचणींवर मात करून उत्तम दर्जाचे संशोधन त्यांनी केलेच आणि आपल्या विद्यार्थ्यांकडून करूनही घेतले. त्यांच्या संशोधनानेच त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.

त्यांचे एकूण ६२ संशोधनपर निबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. तसेच, त्यांनी सुमारे ५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनासाठी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर पातळीवर त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून चार विद्यार्थ्यांनी पीएचडी ही पदवी मिळवली. रसायनशास्त्रातील संशोधनास मदत व्हावी म्हणून त्यांनी ‘रसायननिधी’चा शुभारंभ केला. त्यामध्ये प्रथम आपण रु.१,०००/- दिले आणि मग समाजाला आवाहन केले. संशोधनातील कामे सुचतात, पण त्यासाठी निधी नाही, अशी अडचण नवीन पिढीला येऊ नये म्हणून ही व्यवस्था केली. खूप प्रयत्नांनंतर विश्वस्तांनी एक लाख रुपये जमा केले. विश्वस्तांनी १९२५ साली रसायनशास्त्रावरील संशोधनास मान्यता दिली आणि १९३० साली रसायननिधी स्थापना विषयक विश्वस्तपत्र लिमयांनी रजिस्टर केले. १९३० ते १९३९ साली रिसोरसिनॉल हा पदार्थ माहीत होता, पण त्यावर जगभर नवीन संशोधन सुरू होते. लिमये यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर प्रक्रिया करून तीन टप्प्यांत अल्किल रिसोरसिनॉल यशस्विरीत्या मिळवले. या संशोधनाला ‘निधोन प्रोसेस’ हे नाव दिले. त्यामुळे लिमयांचे नाव जगभर ज्ञात झाले. याबाबत त्यांचा संशोधन निबंध त्यांनीच सुरू केलेल्या ‘रसायनम्’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. नोबेल पुरस्कार विजेते प्रा.डोनाल्ड क्रम यांनी १९९० साली अमेरिकन जर्नलमध्ये लिमयांच्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे. यातच लिमयांच्या संशोधनाचे महत्त्व समजते, तसेच संशोधन किती उच्च दर्जाचे होते, त्याची प्रचिती येते. १९६७ साली लिमये यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन पुणे विद्यापीठाने सत्कार केला.

बाळकृष्ण रसशाळा हा औद्योगिक प्रकल्प स्थापन करून त्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याची कामगिरी केली. रसायननिधीच्या त्रैवार्षिक सभेस नोबेल पुरस्कार विजेते सर चंद्रशेखर रमण हे आले होते. त्यांनी लिमयेंच्या संशोधनाची माहिती समजून घेतली आणि त्यांच्या कामाविषयी नॅशनल केमिकल सोसायटीच्या समारंभात आणि सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात गौरवोद्गार काढले, ही पण लिमयेंच्या कामाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल. ‘रसायनमंदिर’ या संस्थेला सरकारी अनुदान न मिळाल्यामुळे १९६४ साली रसायननिधीच्या विश्वस्तांना ते बंद करावे लागले आणि रसायननिधी पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यातून विद्यापीठाने प्रा.द.बा. लिमये पदव्युत्तर रसायननिधी शोधवृत्ती चालू केली. १९८७ साली ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डी.आर.डी.ओ.) तर्फे रसायननिधीच्या व्याजातून देण्यात येणार्‍या शोधवृत्तीमध्ये भर घालण्यात आली. पण ही शोधवृत्ती विशेष कोणालाही ज्ञात नाही. लिमये यांचे कार्य तीन प्रकारचे आहे. त्यांनी साधन सामग्रीची संपन्नता नसतानाही कल्पकतेने संशोधन करून रसायनशास्त्रातील ज्ञानात मौलिक भर घातली, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संशोधकांची परंपरा निर्माण केली आणि संशोधनासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून रसायननिधीची उभारणी करून त्याचे संवर्धन केले. सर्वांना प्रेरणा देणारे असे कार्य त्यांनी केले, त्याचा तपशील ‘रसमहर्षी’ या समर्पक शीर्षक असलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल.

❀ ३१ जुलै ❀
लेखक मुन्शी प्रेमचंद जन्मदिन

जन्म – ३१ जुलै १८८० (वाराणसी,उत्तरप्रदेश)
स्मृती – ८ ऑक्टोबर १९३६

मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. प्रेमचंदांनी १९१३ ते १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी ‘असरारे महाबिद’ उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक ‘आवाज-ए-ख़ल्क’ मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी ‘मंगलसूत्र’ अपुरी राहिली. प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थान वरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त केली गेली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले. १९२१ पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. १९२३ मध्ये त्यांनी ‘सरस्वती प्रेस’ ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले. प्रेमचंद यांचे साहित्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील प्रेमचंद यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. एक संवेदनशील लेखक, सुजाण नागरिक आणि एक कुशल वक्ता अशी ओळख असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३०० लघुकथा, कादंबऱ्या आणि अनमोल अशा साहित्याचा खजिना दिला आहे. संप्रदाय, भ्रष्टाचार, जमिनदारी, गरिबी अशा विषयांवर भाष्य करत मुन्शी प्रेमचंद यांनी आपले साहित्य रचले होते. अतिशय सोप्या सरळ भाषेत लिखाण करणाऱ्या प्रेमचंद यांचे साहित्य नवोदित लेखकांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

❀ ३१ जुलै ❀
गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी जन्मदिन

जन्म – ३१ जुलै १९०७ (गोवा)
स्मृती – २९ जून १९६६ (पुणे)

प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी अर्थात डी. डी. कोसंबी यांचा जन्म गोवा येथे झाला. ते भारताच्या प्रखर बुद्धिवान लोकांपैकी एक होते. आपल्या वडिलांप्रमाणेच ते जिज्ञासू, अभ्यासू तर होतेच पण मानवतेसाठी झटण्याचा वसा त्यांनी त्यांच्यापासूनच घेतला होता. दामोदर कोसंबी यांचे वडील धर्मानंद दामोदर कोसंबी हे भारतातलं नावाजलेलं नाव. बौद्ध तत्त्वज्ञ म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर होती. धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या मुलाचं नाव आपल्या वडिलांच्या नावावरुनच ठेवलं. पुण्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते वडिलांसोबत अमेरिकेला गेले आणि केंब्रिज लॅटिन स्कूल मध्ये १९२५ पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. पदवीचं शिक्षण त्यांनी हार्वर्ड मधून घेतलं. हार्वर्ड मध्ये असताना त्यांनी गणित, इतिहास आणि भाषांमध्ये रस घेतला. याच ठिकाणी ते ग्रीक, लॅटिन, जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्ये पारंगत झाले. हार्वर्ड मध्ये असतानाच ते प्रसिद्ध गणितज्ञ जॉर्ज बर्कऑफ आणि नॉर्बर्ट विनर यांच्या संपर्कात आले. ते १९२९ मध्ये भारतात परतले. पुढे ते बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यांना अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने गणिताचे प्राध्यापक म्हणून बोलावलं. त्या ठिकाणी ते वर्षभर होते. १९३२ मध्ये ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये नोकरी करू लागले. याच ठिकाणी धर्मानंद कोसंबी यांनी पाली भाषा शिकवली होती. फर्ग्युसन कॉलेज मध्ये त्यांनी १४ वर्षं नोकरी केली. या काळात त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये सिद्ध केलं होते. आधुनिक भारतातील एक महत्त्वपूर्ण विचारवंत अशी त्यांची ओळख बनली. १९४६ मध्ये ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या गणित विभागाचे प्रमुख बनले. १९६२ सालापर्यंत ते या पदावर होते. या संस्थेमुळेच त्यांच्याच तोडीच्या जगभरातल्या तत्त्वज्ञ आणि अभ्यासकांच्या ते संपर्कात आले. त्यांच्या कारकीर्दीचा बहुतांश काळ त्यांनी गणितामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यात आणि अध्यापन करण्यात समर्पित केला. त्यांच्या या विषयातल्या योगदानाचं कौतुक ब्रिटिश वैज्ञानिक जे.डी. बर्नाल यांनी केलं. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कोसंबी यांच्या विश्वशांती चळवळीतील योगदानाची प्रशंसा देखील त्यांनी तितक्याच आत्मीयतेनं केली होती. भारतात धरणं बांधण्यासाठी जागा कोणती निवडावी यासाठी कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती. या गोष्टीला त्यांनी विरोध केला इतकंच नाही तर संख्याशास्त्रावर आधारित पद्धतीनं जागा निवडण्यात यावी यासाठी त्यांनी आग्रह धरला.

याच प्रमाणे त्यांनी मुंबई भागात पावसाळ्यात टायफॉइडनं होणाऱ्या मृत्युचा अभ्यास केला. पावसाळ्याआधी तीन आठवडे टॉयफाइड रोखण्यास योग्य पावलं उचलली गेली तर केवळ मुंबईत वर्षाला किमान १००० हून अधिक जीव वाचतील असं त्यांनी आपल्या अभ्यासातून सिद्ध केलं होतं. त्यावेळच्या मुंबई सरकारला त्यांनी शिफारस केली होती की, नाणेघाटसाठी महागडा रोप-वे तयार करण्याऐवजी सर्व ऋतुंमध्ये उपयोगी येईल असा रस्ता बांधण्यात यावा. कोसंबी यांना ‘प्रबोधनकालीन वैविध्य’ असलेली व्यक्ती असं म्हटलं जात असे. गणितातील अमूर्त कल्पनांचा वापर त्यांनी सामाजिक शास्त्रांमधल्या वेगवेगळ्या उपशाखांवर करून पाहिलं. चिन्हांकित नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संख्याशास्त्राची पद्धत वापरली. त्यांनी त्या पद्धतीनं १२,००० नाण्यांचं वजन केलं होतं. त्यापैकी ७००० नाणी ही आधुनिक होती. त्यांनी आधुनिक नाणेशास्त्राचा पाया भारतामध्ये रोवला. कोसंबी यांनी प्राचीन नाण्यांच्या समूहांचा अभ्यास केला आणि त्यावर ते प्रश्न विचारत असत. ही नाणी कुणी काढली? पुराणं, बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये त्यांना अनेक विसंगती आढळून आल्या. एकाच राजासाठी ते विविध नावं वापरत असत. त्यामुळे त्यांनी ठरवलं की, आपण स्वतःच मूळ ग्रंथांचा अभ्यास करायचा. त्यासाठी संस्कृतवर प्रभुत्व मिळवणं आवश्यक होतं. ते म्हणत की, ‘मला संस्कृत शिकण्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत.’ ते संस्कृत, पाली आणि प्राकृत शिकले. संस्कृतचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. ज्या प्रमाणे त्यांनी नाणेशास्त्र आणि साहित्याच्या विश्लेषणाचं महत्त्व पटवून दिलं. त्याचप्रमाणे त्यांना भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी पुरातत्त्व विभागाचं महत्त्व देखील पटलं होतं. त्यांनी या क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिलं. पुणे जिल्ह्यातल्या पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या पाषाणांचा त्यांनी अभ्यास केला. त्याच बरोबर त्यांनी पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या छोट्या दगडांचा संग्रह केला. त्यांच्या निरीक्षणाच्या आधारावर त्यांनी प्राचीन काळातील राहणीमान, दक्षिण आणि मध्य भारतातील प्रागैतिहासिक काळातील संबंध याची निरीक्षण मांडली.

❀ ३१ जुलै ❀
अभिनेता मोहन भंडारी जन्मदिन

जन्म – ३१ जुलै १९३७
स्मृती – २४ सप्टेंबर २०१५ (मुंबई)

मोहन भंडारी हे टीव्ही मालिका मध्ये काम करणारे अभिनेता. दूरदर्शन वाहिनीवरील ‘खानदान’ या प्रसिद्ध मालिके व्यतिरीक्त त्यांनी ‘कर्ज, परंपरा, जीवन मृत्यू, पतझड, गुमराह’ या मालिका मध्येही काम केले आहे. आमिरच्या ‘मंगल पांडे द रायझिंग स्टार’ या चित्रपटातही ते झळकले होते. ८०च्या दशकात त्यांनी अनेक मालिका मध्ये काम केले होते. मात्र, १९९४ मध्ये ते टीव्ही मालिका पासून दुरावले. त्यानंतर त्यानी ‘सात फेरे’ या मालिकेने पुनरागमन केले. त्यांचा मुलगा ध्रुव हा अभिनेता असून त्याने ‘तेरे शहर मे’ या मालिकेत काम केले आहे.

✹ ३१ जुलै ✹
क्रांतिकारक उधम सिंग स्मृतिदिन

जन्म – २६ डिसेंबर १८९९ (पंजाब)
स्मृती – ३१ जुलै १९४० (लंडन)

सरदार उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक महान सैनिक आणि क्रांतिकारक होते. लंडन मधील जालियनवाला बाग घटने दरम्यान त्यांनी पंजाबचा गव्हर्नर जनरल मायकेल ओ’ड्वायर यांना गोळ्या घातल्या. बर्‍याच इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, ही हत्या पंजाबवर नियंत्रण राखण्यासाठी पंजाबियांना धमकावण्यामागील ओ’ड्वायर आणि इतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केलेली योजनाबद्ध योजना होती. इतकेच नाही तर जनरल डायर यांच्या पाठिंब्याने ओ’ड्वायर यांनी माघार घेतली नाही. जालियनवाला बाग हत्याकांडासाठी उधम सिंगने जनरल डायर यांना ठार मारलेल्या समान नावामुळे सामान्य समज आहे, परंतु प्रशासक यांना असा विश्वास आहे की, एका गोळ्यामुळे उधम सिंग यांचा मृत्यू झाला, तर गोळीबार करणार्‍या जनरल डायरचा अर्धांगवायू आणि विविध आजारांनी मृत्यू झाला. उधम सिंगचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सुनम गावात झाला. १९०१ मध्ये उधम सिंगच्या आईचे आणि १९०७ मध्ये वडिलांचे निधन झाले. या घटनेमुळे त्याला आपल्या मोठ्या भावासोबत अमृतसर मधील अनाथाश्रमात आश्रय घ्यावा लागला. उधम सिंग यांचे बालपणीचे नाव शेरसिंह आणि त्याच्या भावाचे नाव मुक्तासिंग होते ज्यांना अनाथाश्रमात अनुक्रमे उधम सिंग आणि साधुसिंह असे नावे मिळाली. इतिहासकार मालती मलिक यांच्या मते, उधमसिंह हे देशातील सर्व धर्माचे प्रतीक होते आणि म्हणूनच त्यांनी आपले नाव राम मोहम्मदसिंग आझाद असे ठेवले जे भारताच्या तीन प्रमुख धर्मांचे प्रतीक आहे. १९१७ मध्ये उधम सिंग अनाथ आश्रमात राहत होता नि त्याच वेळेस त्याच्या मोठ्या भावाचाही तेव्हा मृत्यू झाला. तो पूर्णपणे अनाथ झाला. १९१९ मध्ये त्यांनी अनाथाश्रम सोडले आणि क्रांतिकारकांसह स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. उधमसिंह अनाथ होते, परंतु असे असूनही तो विचलित झाला नाही आणि त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी डायरची हत्या करण्याच्या वचनपूर्तीसाठी कार्य केले. १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियांवाला बाग हत्याकांडातील उधम सिंग हे प्रत्यक्षदर्शी होते. जालियनवाला बागेत ठार झालेल्या लोकांची नेमकी संख्या राजकीय कारणांमुळे कधीच उघडकीस येऊ शकली नाही. या घटनेने वीर उधमसिंह ‘तिलमिला’ येथे गेला आणि मायकल डायरला धडा शिकवण्या साठी जालियनवाला बाग हातात घेतला. आपले ध्येय पार पाडण्यासाठी उधमसिंग आफ्रिका, नैरोबी, ब्राझील आणि अमेरिकेच्या विविध नावांनी प्रवास केला. १९३४ मध्ये उधम सिंग लंडनला पोहोचला आणि तेथे ९, एल्डर स्ट्रीट कमर्शियल रोड येथे वास्तव्य केले. तेथे त्याने प्रवासाच्या उद्देशाने एक कार खरेदी केली आणि आपले अभियान पूर्ण करण्यासाठी सहा बुलेटसह एक रिवॉल्व्हर खरेदी केली. मायकेल डायरचा ठावठिकाणा स्थापित करण्यासाठी भारताच्या या वीर क्रांतिकारकाने योग्य वेळी प्रतीक्षा केली. उधम सिंग यांना १९४० मध्ये शेकडो भावंडांच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी मिळाली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या २१ वर्षांनंतर १३ मार्च १९४० रोजी रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची लंडन मधील कॅक्सटन हॉल येथे बैठक झाली जिथे मायकेल डायर हे देखील भाषक होते. उधम सिंग त्या दिवशीच सभास्थळी पोहोचला. त्याने आपली रिवॉल्व्हर जाड पुस्तकात लपविली. त्यासाठी त्यांनी पुस्तकातील पाने रिवॉल्व्हरच्या आकारात अशा प्रकारे कापली होती की, डायरचे जीवघेणे हत्यार सहज लपू शकेल. बैठकी नंतर भिंतीच्या मागून उधम सिंगने मायकेल डायरवर गोळीबार केला. मायकल डायरला दोन गोळ्या लागल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. उधम सिंगने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला अटक केली. त्याच्यावर खटला चालविला गेला. ४ जून १९४० रोजी उधमसिंग हत्येचा दोषी ठरला आणि ३१ जुलै १९४० रोजी त्याला पेंटनविले कारागृहात फाशी देण्यात आली.

✹ ३१ जुलै ✹
सुधारक नाना शंकरसेठ स्मृतिदिन

जन्म – १० फेब्रुवारी १८०३ (मुरबाड,ठाणे)
स्मृती – ३१ जुलै १८६५ (मुंबई)

जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या जडण घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो. पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बॅंकांकडे न देता शंकरशेठ यांच्या हवाली करीत. नाना शंकर शेठ यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला. त्यांच्या वडिलांनी व्यापारामध्ये मोठी संपत्ती मिळवलेली होती, त्यामुळे नानांचा बालपण हे अतिशय संपन्नते मध्ये गेलं. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्या मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारा साठी व्हावी या हेतूने त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणी मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. नाना शंकरसेठ यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला, तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला. एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, तथापि ते नाना शंकरशेठ या नावानेच अधिक परिचित आहेत. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली.

नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. नाना शंकरशेठ यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला. त्यांच्यावर सर जमशेटजी जिजीभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एलफिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स.का.छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एलफिन्स्टन नंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एलफिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्टुडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४५) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४८) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या. १८५७ मध्ये, द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरू केले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेठ होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी १८५२ मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते. नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगर पालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. तसेच नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या सुद्धा दिल्या. देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या सार्‍या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. १८५७ मध्ये आलेले किटाळ पूर्णतः दूर होऊन त्यांचे कार्य अधिकच चमकले. नानांचे वयाच्या ६२व्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणार्‍या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली. नानांना ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ किंवा ‘मुंबईचे शिल्पकार’ असे हि म्हणतात.

✹ ३१ जुलै ✹
गायक मोहम्मद रफी स्मृतिदिन

जन्म – २४ डिसेंबर १९२४ (पंजाब)
स्मृती – ३१ जुलै १९८० (मुंबई)

दिन ढल जाये हाय रात न जाये, तेरे मेरे सपने अब एक रंग है, कभी खुद पे कभी हालात पे रोना आया; अशा अनेक अजरामर गाण्यांमध्ये पडद्यावर दिसला तो चेहरा देव आनंदचा आणि आवाज होता मोहम्मद रफींचा. शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे ‘गाँव की गोरी’ या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणी नंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चं दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना ‘चौदहवी का चाँद’ च्या शिर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारा बरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी; मन मोरा बावरा (रागिनी) आणि ‘अजब है दास्ता तेरी ये जिंदगी’ ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजीकडून गाऊन घेतली होती. १९६९-७० मध्ये ‘आराधना’ मधील ‘मेरे सपनो की रानी’ आणि ‘रूप तेरा मस्ताना’ गाजल्यावर सुपरस्टार राजेश खन्ना नेहमी किशोर कुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली. पण त्यातूनही ‘हम किसीसे कम नही’ मधल्या ‘क्या हुवा तेरा वादा’ या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं. हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या मदतीने ‘कर्ज’ साठी ‘दर्द्-ए-दिल’ गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता ‘संगीत’ हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं.

लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या छोट्या छोट्या वादांचं आणि मतभेदांचं पर्यावसान एकमेका बरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. ‘दिल ने फिर याद किया’ या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली. पण नेमकं त्याचवेळी ‘लता आणि रफी हे एकमेका बरोबर गाणार नाहीत’ असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळलं, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. वैयक्तिक पातळीवर मात्र त्याचे वाद कधीच मिटले नाहीत. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोर कुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ ‘एक रुपया’ मानधन घेतलं असही म्हटलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील. असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की, ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. ‘दोस्ती’ चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी ‘चाहूंगा मैं तुझे’ या गीताला फिल्मफेअर मिळाले. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत त्यांनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल या अनेक प्रकारा मध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत, तसंच पतंग उडवणे हा त्यांचा छंद होता.

✹ ३१ जुलै ✹
विज्ञानवादी ताहेरभाई पूनावाला स्मृतिदिन

जन्म – २१ डिसेंबर १९२२
स्मृती – ३१ जुलै २०१७

ताहेरभाई पूनावाला हे विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ होते. त्यांचा जन्म दाऊदी बोहरा समाजातील कुटुंबामध्ये झाला. सुधारणावादी बोहरा चळवळीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही विशेष उल्लेखनीय आहे. सैय्यदना साहेब यांचे या समाजावर असलेले वर्चस्व त्यांनी झुगारून दिले. त्याचा परिणाम म्हणून समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. बोहरी आळीतील त्यांच्या दुकानातील नोकर काम सोडून गेले. व्यापाऱ्यांशी संबंध दुरावले. पूनावाला यांच्या समवेत असलेल्या लोकांवरही बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र, काहींनी माफी मागून त्यातून मार्ग काढला. पूनावाला आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हा बहिष्कार त्यांनी आनंदाने स्वीकारला.
विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारे पूनावाला धर्म जातीपलीकडचा विचार करणारे होते. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. बाबा आढाव यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते समितीचे काही काळ कोशाध्यक्ष होते. चांगल्या उपक्रमांच्या पाठीशी उभे राहून अशा व्यक्तींना अर्थसाह्य करण्यामध्ये पूनावाला आघाडीवर असत. दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी त्यांची मैत्री होती. या मैत्रीतून त्यांनी ‘बॉबी’ चित्रपटा मध्ये ग्रंथपालाची छोटीशी भूमिका केली होती. सरदार दस्तूर स्कूलच्या समितीवर त्यांनी काम केले होते. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

🌹 ३१ जुलै 🌹
डॉ. शांताराम मुजूमदार # वाढदिवस

जन्म – ३१ जुलै १९३५ (गडहिंग्लज,कोल्हापूर)

सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचवले अशा डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांचा जन्म गडहिंग्लज जि.कोल्हापूर येथे झाला. पुण्यात भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षणाच्या माध्यमातून सांसाकृतिक मिलाफ घडवून आणण्याचे काम केले ते डॉ. शांताराम मुजूमदार यांनी. सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचले. डॉ. एस.बी. मुजूमदार यांचे पूर्ण नाव शांताराम बळवंत मुजूमदार. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. गडहिंग्लज मध्ये त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूर आणि पुण्यातून पूर्ण केले. पुण्यात शिक्षण पूर्ण करत त्यांनी बॉटनी मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीनमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएचडी मिळवली. डॉ. एस.बी. मुजूमदार हे फर्ग्युसन महाविद्यालयात बॉटनीचे विभागप्रमुख होते. सुमारे २० वर्षे ते या पदावर होते. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे ५० च्या वर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी जीव शास्त्रावर आधारित काही पुस्तकेही लिहिली आहेत. पण निवृत्तीला १६ वर्षे बाकी असतानाच त्यांनी सिम्बायोसिस संस्था वाढवण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. डॉ.मुजूमदार यांनी त्यांचा बंगला विकून आणि पेन्शनच्या पैशाचा उपयोग करून पैसा गोळा केला. गरीब विद्यार्थ्यांना वाजवी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतून शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय डॉ.मुजूमदार यांनी घेतला. मैलाचा दगड ठरलेल्या सिम्बायोसिसचा प्रवास १९७१ मध्ये सुरू झाला होता. विशेष म्हणजे यामागची कथाही अत्यंत रंजक अशी आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. एस.बी. मुजुमदार यांनीच हा किस्सा सांगितला आहे. सिम्बायोसिसच्या वेबसाईटवरही त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

मुजूमदार सांगतात, एकदा मी घराच्या खिडकीत उभा राहून हॉस्टेलकडे पाहत होतो. मी त्यावेळी हॉस्टेलचा प्रमुख होतो. त्यावेळी मला एक विचित्र घटना दिसली. एक मुलगी हॉस्टेल मध्ये एका मुलाच्या खोलीकडे जाताना दिसली. तिने त्या मुलाच्या हातात पटकन काहीतरी दिले आणि लगेचच निघून गेली. मी अनेक दिवस हा प्रकार पाहत होतो. रोज तसेच घडत होते. त्या दोघांमध्ये अफेयर सारखं काहीतरी भलतंच असल्याचा संशय माझ्या मनात आला. त्यामुळे मी एक दिवस पाहायला गेलो. त्या मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. आत मॉरीशसचा एक विद्यार्थी बेडवर पडलेला होता. त्याचा चेहरा सुकलेला होता, डोळे खोल गेलेले होते. तो फारच अशक्त दिसत होता. मला काहीही कळत नव्हते. मी त्या मुलाला जेव्हा विचारले, तेव्हा त्याने सांगितले, सर मला कावीळ झालेला आहे. त्यामुळे प्रचंड अशक्तपणा आला होता. मला चालताच काय उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे माझ्या ओळखीची ही मुलगी मला जेवण आणून देते. मुलांच्या हॉस्टेल मध्ये मुलींना प्रवेश नसल्याने ती मला डबा देऊन लगेच निघून जायची. हे सर्व ऐकूण मी स्तब्ध झालो. कारण मला संशय आला तसा काहीही प्रकार (अफेयरचा) नव्हता. मला खूप वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय शोधायला हवे असे मला प्रकर्षाने जाणवले. हीच ती वेळ होती. सिम्बायोसिसचा जन्म झाला होता. डॉ. एस.बी. मुजूमदार यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने २००५ मध्ये पद्मश्री तर २०१२ मध्ये पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी गौरवले. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा पुण्यभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कारही त्यांना देण्यात आला.

🌹 ३१ जुलै 🌹
अभिनेत्री मुमताज # वाढदिवस

जन्म – ३१ जुलै १९४७ (मुंबई)

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मुमताज. ६० आणि ७० च्या दशकात एकामागून एक हिट सिनेमे देणाऱ्या मुमताज यांचा एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट ते सुपर हिरोईन पर्यंत प्रवास केला. मुमताज यांनी बाल कलाकाराच्या रुपात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या हिंदी सिनेमांमध्ये एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्टच्या रुपात झळकल्या. सुरुवातीच्या काळात त्यांना नशीबाची साथ मिळाली नाही, म्हणून लो बजेट आणि बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांना काम करावे लागले. १९६५ हे वर्ष मुमताज यांच्या करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले. यावर्षी मुमताज यांचा ‘ऐ मेरे सनम’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या नकारात्मक भूमिकेमुळे मुमताजच्या आयुष्यात सर्वकाही सकारात्मक होऊ लागले. बी ग्रेड सिनेमांमधली हिरोईनला आता ए ग्रेड सिनेमे मिळू लागले होते. पत्थर के सनम, राम और श्याम आणि ब्रम्हचारी या सिनेमांमध्ये त्यांनी सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दो रास्ते’ या सिनेमातील हीरो होते सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यांच्या प्रेयसीच्या भूमिका मुमताज यांनी वठवली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि मुमताज एका रात्रीत बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील झाल्या. या सिनेमाबरोबर मुमताजच्या यशाचा काळ सुरु झाला. यानंतर मुमताजे यांनी वळून बघितले नाही. आदमी और इन्सान, परदेसी, सच्चा झुठा या सिनेमांमुळे त्यांची गणती बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री मध्ये होऊ लागली. १९७० साली रिलीज झालेल्या ‘खिलौना’ या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मुमताज यांनी आपल्या फिल्मी करिअर मध्ये अनेक संस्मरणीय सिनेमे दिले. अधिकाधिक सिनेमांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. के. बालाचंदर दिग्दर्शित आणि १९७४ मध्ये रिलीज झालेल्या ‘आईना’ या सिनेमात मुमताजच्या अभिनयाचा वेगळा पैलू बघायला मिळाला. समीक्षक आणि स्वतः मुमताज या सिनेमातील भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनय समजते. फिरोज खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अपराध’, ‘इंटरनॅशनल गँग’, ‘कॉनमॅन’ या क्राईमवर आधारित सिनेमांमध्ये मुमताज यांनी खूप बोल्ड सीन दिले होते. या सिनेमांमध्ये त्यांनी टू पीस बिकिनी परिधान करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. मुमताज यांच्यावर चित्रीत झालेले ‘हमारे सिवा तुम्हारे और कितने दिवाने है’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. यशोशिखरावर असताना १९७४ मध्ये मुमताज व्यावसायिक मयुर माधवाणी यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. लग्नगाठीत अडकल्यानंतर आपले प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण होईपर्यंत हिंदी सिनेमा मध्ये काम केले. २०१२ मध्ये भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुमताज यांना इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीच्या वतीने सेकंड मोस्ट पॉप्युलर ब्युटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या मुमताज लंडन मध्ये वास्तव्याला आहेत.

🌹 ३१ जुलै 🌹
अभिनेत्री कियारा अडवाणी # वाढदिवस

जन्म – ३१ जुलै १९९२ (मुंबई)

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी चं खरं नाव आलिया. ‘अंजाना अंजानी’ तलं प्रियांकाचं नाव तिला आवडलं आणि त्याच नावाने ती इंडस्ट्रीत आली. तिला सगळ्यात मोठा ब्रेक मिळाला तो नीरज पांडेच्या ‘एम. एस. धोनी’ मधून. ह्यात तिनं धोनीच्या बायकोची म्हणजेच साक्षीची भूमिका केली होती. सुशांतसिंग बरोबर कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली त्यानंतर ती अब्बास-मस्तान यांच्या ‘मशीन’ या चित्रपटामध्ये झळकली. दुर्दैवाने तो चित्रपट फ्लॉप ठरला. ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून सर्वत्र लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी हीचा चित्रपट सृष्टीतील सुरुवातीचा प्रवास म्हणावा तेवढा यशस्वी ठरला नव्हता. ‘फगली’ या चित्रपटातून कियारा अडवाणीने तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर ‘मशिन’ या चित्रपटात तिला भूमिका मिळली, मात्र या दोन्ही चित्रपटामध्ये तिला लोकप्रियता मिळाली नाही. पण त्यानंतर चर्चेत असलेल्या ‘लस्ट स्टोरी’ या वेब सिरीज मध्ये प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. आणि त्यानंतर ‘कबीर सिंग’ चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे ती सर्वत्र प्रसिद्ध झाली. नंतर कियारा ‘गुड न्यूज’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलीआहे. या चित्रपटात तिच्यासोबत करीना कपूर, अक्षय कुमार व दिलजीत दोसांझ हे देखील मुख्य भूमिकेत होते. याशिवाय कियारा ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘इंदु की जवानी’, भूल भुलैया २’ व ‘शेरशाह’ हे आगामी चित्रपट येणार आहेत.

🌹 ३१ जुलै 🌹
अभिनेत्री ज्योती सुभाष # वाढदिवस

जन्म – ३१ जुलै

बालपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड असलेल्या आणि राष्ट्र सेवा दलाचे संस्कार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत नाटक आणि चित्रपट क्षेत्रात गेली अनेक वर्ष आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाद्वारे ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री ज्योती सुभाष या माहेरच्या ज्योती देशपांडे. त्यांनी सुभाषचंद्र ढेंबरे यांच्याशी लग्न केले. पुढे त्यांनी नाट्य व चित्रपट सृष्टीत ज्योती सुभाष हे नाव लावून कामे केली आहे. ज्योती यांच्या घरात कलेचा वारसा होताच. त्या शाळेत असताना पासूनच नाटकात काम करायला लागल्या. त्यांच्या आई गाणे शिकवत असत. त्यांच्या काकू पारशी आणि मणीपुरी नृत्यात पारंगत होत्या. राष्ट्र सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते कायम त्यांच्या घरी येत असत. त्याकाळात त्यांच्या घरी महर्षी कर्वे, साने गुरुजी असे अनेक थोर लोक येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असत. एक प्रकारे त्यांचे घर सामाजिक मंथनाचे केंद्र होते. त्यामुळे तेथे ज्योती यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी परिचय झाला. ज्योती सुभाष यांचे मोठे भाऊ गो.पु. देशपांडे यांनी अनेक वैचारिक आणि चर्चात्मक नाटके लिहिली आहेत. ते समीक्षक होते. दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून देखील काम केले होते. ज्योती यांच्या नृत्याची आणि अभिनयाची आवड बघून घरच्यांनी त्यांना पुण्यातील काकूकडे पाठविले. तेथे राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. कलावंत निळू फुले हे या कलापथकाचे दिग्दर्शन करीत होते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे कलावंत म्हणून समाजासाठी काहीतरी करायला हवे, ही भावना त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून आणि सहकाऱ्यांकडून मिळाली.

पुण्यामध्ये काही काळ शिक्षण घेतल्यावर मग त्या बडोद्याला गेल्या. तेथे भरतनाट्यम् शिकल्या. नृत्य आणि अभिनयाचे शिक्षण सुरु असताना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या नवी दिल्लीला गेल्या. त्याच काळात सई परांजपे आणि अल्काझी यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्या मुळे ज्योती नाटकाकडे वळाल्या. राकेश मोहन यांच्या ‘आषाढ के एक दिन’ या नाटकात त्यांनी काम केले. हे त्यांचे पहिले नाटक. त्याच काळात मराठी रंगभूमी बरोबर गुजराती, हिंदी आणि जागतिक रंगभूमीचा देखील त्यांचा परिचय झाला. इतर भाषा मधील नाटके हिंदीत भाषांतरित करून ते प्रसारित करत असत. दिल्लीला असताना एनएसडी मध्ये नसरुद्दीन शहा, ओमपुरी, बी. जयश्री अशा कलावंतांशी त्यांचा परिचय झाला. पुढे त्यांनी गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’ नाटकात काम केले. ‘नटसम्राट’ या मूळ नाटकात अभिनेत्री शांता जोग यांनी आप्पासाहेब बेलवलकर यांच्या पत्नीची कावेरीची भूमिका साकारली होती. मात्र नाटक पुनर्जीवित करताना डॉ. लागू यांनी ज्योती यांना ही भूमिका करण्या विषयी विचारले, दुर्दैवाने ते नाटक पुढे येऊ शकले नाही. पुढे जाऊन नटसम्राटची डीव्हीडी करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी “ज्योती यांना सांगितले होते आणि कावेरीची भूमिका ती करेल” असे सांगितले. त्यामुळे नटसम्राटच्या डीव्हीडी मध्ये त्या दिसतात. ज्योती सुभाष यांनी नाटका बरोबरच मराठी व हिंदी चित्रपटात आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी अय्या (हिंदी), फूंक (हिंदी), गाभ्रीचा पाऊस, चि. व वि. सौ. कां., दहावी फ, पुरुष, वळू अशा चित्रपटात अभिनय केला आहे. अनेक नाटके आणि चित्रपटा मध्ये अभिनय केल्या नंतर आता ज्योती यांनी सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक ‘हमीद दलवाई’ यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवून लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ‘हमीद दलवाई’ हा विषय घेऊन हा चित्रपट तयार केला असून ‘Hameed : The Unsung Humanist’ या नावाने आहे. हमीद यांच्या पत्नीने लिहिलेल्या पुस्तकाचा वापर त्यांनी हा चित्रपट बनविण्यासाठी केला आहे. चित्रपट तयार करताना अभिनेता म्हणून नसरुद्दीन शाह यांनाच काम करण्यासाठीचा विचार त्यांच्या मनात आला. हमीद दलवाईंचीच ‘इंधन’ ही कादंबरी वाचून नसरूद्दीन काम करण्यास तयार झाले. ज्योती सुभाष यांचा मोठा मुलगा अमेरिकेत राहतो तसेच अभिनेत्री अमृता सुभाष ही ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अमृता सुभाषने देखील मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मराठी प्रमाणेच बॉलिवूड मध्ये देखील ती तितकीच प्रसिद्ध आहे.

🌹 ३१ जुलै 🌹
अभिनेत्री नीलकांती पाटेकर # वाढदिवस

जन्म – ३१ जुलै

अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांनी १९८९ मध्ये सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आत्मविश्वास’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला होता. त्यांनी यापूर्वी काही मालिका मध्ये काम केले होते. २८ वर्षांनी २०१६ मध्ये त्यांनी सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या पुस्तकावर आधारित नीलिमा लोणारी यांच्या ‘बर्नी’ या चित्रपटात भूमिका केली होती. नाना पाटेकर यांच्या पत्नी असलेल्या नीलकांती नानांच्या पासून विभक्त राहतात. त्यांच्या अद्यापही घटस्फोट झालेला नाही. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे. एका मुलाखती मध्ये नानांनी म्हटले होते की, आम्ही रोज भेटतो आणि एकमेकांची काळजी घेतो. त्यांनी थिएटर आर्टिस्ट नीलू उर्फ नीलकांती यांच्याशी विवाह करताना फक्त ७५० रुपये खर्च केले होते. आपल्या लग्नाची गोष्ट त्यांनी एका मुलाखती मध्ये सांगितली होती. नानांनी सांगितल्या प्रमाणे, “मी ठरवलेच होते की, विवाह करणार नाही. त्यामुळे नाट्यगृह जॉइन केले. पैसे कमवण्यास सुरुवात केली की एखादी मुलगी लग्नास होकार देईल आणि तेव्हा पाहू असे मला वाटत होते. यानंतर मी नीलूशी विवाह केला. आमची पहिली भेट थिएटर मध्येच झाली होती. ती खूप चांगली अ‍ॅक्ट्रेस होती आणि अतिशय सुंदर स्क्रिप्ट लिहिते. नीलू एका बँकेत अधिकारी होती आणि महिन्याला २५०० रुपये कमवत होती. त्यावेळी मला एका शोसाठी फक्त ५० रुपये मिळत होते. महिन्यातून १५ शो केल्यास ७५० रुपये इतकी कमाई व्हायची. अर्थात नीलू आणि माझी कमाई मिळून घरात ३२५० रुपये महिन्याला येत होते. ही रक्कम गरजे पेक्षा खूप अधिक होती. अभिनया सोबतच त्या एक सिरेमी शिल्पकार असून त्यांनी डिसेंबर २०१२ मध्ये हे काम करणे सुरू केले आणि आज पर्यंत त्या यात कार्यरत आहेत.”

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments