प्रतिनिधी : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचा नावलौकिक आहे परंतु मागील १० वर्षात मुंबईच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. मुंबईचे महत्व सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न केला, मुंबईचे विमानतळ, मुंबईतील मोकळ्या जागा एकाच उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहेत. धारावीसह शहराच्या झोपडपट्टीतील गरिबांना बेघर करून अदानीला मोक्याच्या जागा दिल्या जात आहेत. मुंबई ही मुंबईकरांची आहे व मुंबईकरांचीच राहिली पाहिजे यासाठी मुंबई शहर अदानीला विकणाऱ्या भाजपा-शिंदे सरकारला धडा शिकवा, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई शहराचा सर्वांगिण विकास करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे हे कोणीही नाकरू शकत नाही. मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेसचे सरकार असतानाच झाली. मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटन क्षेत्रांची भरभराट काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मुंबई मेट्रो, वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स, राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतू, चेंबूर FCLR लिंक रोड, कोस्टल रोड, अटल सेतू या प्रकल्पांची आखणी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार आणि केंद्रातील डॉ. मनमोहनसिंह सरकार असताना करण्यात आली. मुंबईतील कायदा सुव्यवस्था जागतिक पातळीवरची राहिली आहे परंतु भाजपा सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदारच खुलेआम धमक्या देत आहेत, गोळीबार करत आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबार झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री मुंबईतील कायदा सुव्यवस्था हाताळण्यात सपशेल फेल झाले आहेत असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
धारावी व मुंबईतील महत्वाचे भूखंड सर्व नियम व अटी बाजूला ठेवून अदानी व भाजपाच्या मित्रांना दिले जात आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचीही शिंदे-भाजपा सरकारने वाट लावली, मुंबई मेट्रोसाठी पर्यावरणाचा विचार न करता झाडांची कत्तल करण्यात आली. सरकारी धोरणे मुंबईकरांच्या हितासाठी नाही तर केवळ मुठभर धनदांडग्या लोकांसाठी आखली जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. मुंबईकरांच्या हिताच्या आड येणाऱ्या महाभ्रष्टयुतीला लोकसभेच्या निवडणुकीत जागा दाखवा व इंडिया आघाडीला विजयी करा, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आज वांद्रे पूर्व भागात चेतना कॉलेजजवळ निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले, यावेळी माजी मंत्री व शिवसेना नेते अनिल परब उपस्थित होते. वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लब ते भारत नगर आणि कुर्ला पूर्व भागात स्वदेशी चाळ ते तक्षशिला नगर जनसंवाद यात्रा काढण्यात आली. टिळकनगर येथील बुद्ध विहाराला भेट दिली व कुर्ला पूर्व भागातील शिवसेना शाखा क्रमांक १६९ येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले तसेच कुरेशी नगरमधील समाज बांधवांशी संवाद साधला.