महाबळेश्वर(अजित जगताप) : रयतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवरील संकट असलेल्या अफजलखानाचा वध केला. ज्या ठिकाणी हा वध केला. त्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील प्रतापगड या किल्ल्यावर पुढील शिवप्रताप दिनी शिवप्रताप स्मारकाची उभारणी होणार आहे. त्यामुळे शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आतापासूनच निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, पावणे चारशे वर्षांपूर्वी म्हणजे दि: १० नोव्हेंबर१६५९ साली स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कंठस्नान घातले होते. या दिवसाची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी लाखो शिवभक्त या ऐतिहासिक लढ्याचे आपल्या डोळ्यासमोर इतिहास आणतात. परंतु आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवप्रताप स्मारकाच्या रूपाने हा इतिहासाचा दिसणार आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि सातारा जिल्ह्यातील कराडचे सुपुत्र श्री विक्रम पावसकर यांनी राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबई येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांच्याशी याबाबत श्री विक्रम पावसकर यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच पर्यटन वाढीसाठी आणखीन काय करता येईल? याची ही माहिती दिली.
ऐतिहासिक किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रस्तावित शिवप्रताप स्मारकासंदर्भात तसेच किल्ल्याच्या दुरुस्ती बाबत झालेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. हा इतिहास संपूर्ण जगाला माहित आहे. आता स्मारकाच्या रूपाने तो भावी पिढीला ऊर्जा देणारा ठरणार आहे.प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारकासाठी यापूर्वी दहा कोटी रुपयांची महाराष्ट्र शासनाने तरतूद केलेली आहे.
काही दिवसांपूर्वीच या शिवप्रताप
स्मारकात उभारण्यात येणारा अफजल
खान वधाचा भव्य पुतळा तयार झाला आहे. पुढील वर्षी शिवप्रताप दिनी हे स्मारक पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या प्रतापगड किल्ल्यावर अनेक कुशल कारागीर किल्ल्याचे देखभाल दुरुस्ती आणि या शिवप्रताप स्मारकासाठी परिश्रम घेत आहेत. या कामासाठी स्थानिकांचेही खूप मोठे योगदान लाभत आहे.
___________________________________
फोटो- शिवप्रताप स्मारकाबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी चर्चा करताना श्री विक्रम पावसकर (छाया – अजित जगताप, मुंबई)