मुंबई :- मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील दोन ते तीन तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पालिका प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सखल भागात पाणी साचू नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री स्वत: ग्राऊंडवर उतरण्याची शक्यता आहे. ते आज कंट्रोल रुमला भेट देऊ शकतात.
सायन परिसरात रस्त्यावर पाणी साचलं आहे. सायन उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी झालं आहे. दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये देखील पाणी साचलं आहे. हिंदू कॉलनीला तलावाचा स्वरूप आलं आहे. मुंबई उपनगरात देखील पाण्याचा जोर वाढला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. रस्त्यावर गुडघ्याच्या वरती पाणी साचले असल्याने लोकांना वाट काढत चालावं लागत आहे.
समुद्रामध्ये मोठ्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. चार ते साडेचार मीटरपर्यंच उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरु राहीला तर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. रस्त्यांवर पूर्ण पाणी साचलं आहे. मुंबईकरांना वाहनं चालवणे देखील कठीण झाले आहे. पावसाचा परिणाम लोकल सेवेवर देखील पाहायला मिळू शकतो.