मुंबई (शांताराम गुडेकर ) विक्रोळी येथील विकास हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त शाळेत “मूल्यांचे संवर्धन करणारी दिंडी” अनुभवली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अभंग भजन यांचे गायन केले. ज्ञानोबा माऊली तुकाराम चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल ,विठू माऊली तू माऊली जगाची या विठ्ठलाच्या अभंगांवरती टाळांच्या गजरात दिंडीचा अनुभव घेतला. भारतीय संस्कृती मधील सण उत्सव आणि त्यामधून रुजवली जाणारी नैतिक मुल्ये यांची जोपसना करण्याचा प्रयत्न केला गेला. पारंपारिक वारकरी वेषभूषेमधील विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल-रखुमाई, संत नामदेव, संत तुकाराम यांच्या वेषभूषेमधील विद्यार्थ्यांमुळे जणू अवघे पंढरपूर शाळेमध्ये अवतरले होते. संपूर्ण वातावरण विठ्ठल नामाच्या गजराने भारावून गेले होते. दिंडीमध्ये घातले जाणारे रिंगण, फुगड्या याचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचे आदर्श शालेय वर्तन कसे असावे यासंदर्भातील घोषवाक्य तयार करण्यात आलेली होती. या घोषवाक्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा, सर्वधर्मसमभाव, राष्ट्भक्ती, सौजन्यशीलता, विद्यार्थी शालेय वर्तन नियमावली इत्यादी बाबत जागृती करण्यात आली मुख्याध्यापिका वैष्णवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी कला शिक्षिका सुप्रिया पवार यांनी केली होती. पालक आणि शिक्षकांनी सुद्धा उत्साहाने या दिंडी मधे सहभाग घेतला आगळ्या वेगळ्या अशा मूल्यांची जपणूक आणि रुजवण करणाऱ्या या दिंडीचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प. म. राऊत ,चिटणीस डॉक्टर विनय राऊत यांनी केले.
विकास हायस्कूल शाळेत विद्यार्थांची मूल्य संस्काराची दिंडी
RELATED ARTICLES