Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुंबई, ठाणे, नवी मुंबईवसंत मोरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंनी दिली मोठी...

वसंत मोरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

मुंबई : पुण्यातील माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवलेल्या वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी 9 जुलै रोजी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे यांनी मुंबई गाठली. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आणि मनसेतून त्यांच्यासोबत शिवसेनेता आलेल्या पदाधिकाऱ्यांसमवेत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. यावेळी, बऱ्याच दिवसांनी पाऊस आला, आणि पावसासोबत वसंतही आला, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी वसंत मोरेंचे स्वागत केले. तर, उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंचे पक्षात स्वागत करताना, तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात, तुमचा पक्षात प्रवेश नसून स्वगृही परतत आहात. मात्र, तुम्हाला शिवसेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी, असे म्हणत आता पुण्यात  शिवसेना आणखी वाढवा, हीच जबाबदारी मी देत असल्याचे म्हटले.  

मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्याहस्ते वसंत मोरेंसह त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. यावेळी, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, भाषण करताना वसंत मोरेंनी आता पुन्हा शिवसेनेत परत आलो असून हा पक्षप्रवेश नसून आपल्याच पक्षात घरवापसी करत असल्याचे म्हटले.

उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना वसंत मोरेंना चिमटा काढला. शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय मान-सन्मान मिळतो, कसा अपमान केला जातो, असे म्हणत मनसेकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ”शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर मिळालयाच हवी, ती वसंत मोरेंनाही मिळायला पाहिजे. मी वसंत मोरेंसह तुम्हालाही शिक्षा देतोय. मला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments