प्रतिनिधी : पंढरपूर मधील श्री विठ्ठलाचे दर्शन २ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन १५ मार्च पासून बंद करण्यात आले होते. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल मंदाराच्या जीर्णोधराचे काम सुरु करण्यात आले होते. १ जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असून २ जून पासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोधराचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील कामदेखील पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. मंदिर जीर्णोध्दाराचे काम सुरु असल्यामुळे भाविकांना केवळ मुखदर्शनसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे भाविक नाराज होते. यानंतर मंदिर समितीने मंदिरातील जीर्णोधराच्या कामाचा आढावा घेतला. आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत २ जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.