Monday, October 13, 2025
घरमहाराष्ट्रकोल्हापूरमाथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार ; समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच...

माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार ; समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने वाटचाल करत समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच राज्य शासनाचे धोरण आहे. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच मोठ्या संख्येने माथाडी कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी संघटन उभे केले. आपल्या समाजातील लोकांच्या हितासाठी, माथाडी कामगारांच्या विकासासाठी, व्यवस्था उभारण्यासाठी आपले घर-संसार पणाला लावणारे नेते इतिहासात कमीच आढळतात. त्यापैकी दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील एक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली. या चळवळीला त्यांनी संघटित स्वरूप दिले. अण्णासाहेबांच्या त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांना आवाज मिळाला, सुरक्षा मिळाली आणि पुढील पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळाला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेबांनी मोठा लढा दिला. मराठा समाजासाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानातूनच मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पुराव्याअभावी आरक्षणापासून वंचित असलेला मराठा समाज आता आरक्षणासाठी पात्र ठरला आहे.

मराठा तरुणांसाठी शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. शिक्षणासाठी शहरात राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भत्ता म्हणून दरवर्षी ६० हजार रुपये देण्यात येतात. मराठा तरुण-तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळावे, त्यांना एमपीएससी, युपीएससी परीक्षा देता याव्यात यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन केली. आतापर्यंत सारथीच्या माध्यमातून ११२ तरुण आयएएस आणि आयपीएस म्हणून नियुक्त झाले आहेत. १ हजार ४८ तरुण-तरुणी महाराष्ट्र शासनात एमपीएससीद्वारे अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. आतापर्यंत सारथीच्या योजनांचा ८ लाख ३८ हजार ४७७ तरुण-तरुणींनी लाभ घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा तरुणांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून, या माध्यमातून दीड लाख तरुण-तरुणी उद्योजक झाले आहेत. त्यांना कर्जाच्या स्वरूपात १३ हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, असे विविध महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतले असून, अशाच प्रकारचे विविध निर्णय इतर समाजातील तरुणांसाठीही घेण्यात आले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण आहे.

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते निश्चित करू. नियमांनुसार माथाडी कामगारांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्यांचे आभार मानले. माथाडी कामगारांच्या निवासासाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख उद्योजक निर्माण करता आले, सेही त्यांनी सांगितले.

कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात माथाडी कामगारांचे प्रश्न मांडले.

यावेळी माथाडी भूषण मानकरी दिनकर कृष्णा काटकर, विश्वास कृष्णराव पिसाळ, जनाबाई नारायण धुमाळ, वामन सिताराम वैद्य, मधुकर साहेबराव कदम, राजेंद्र खाशाबा लंभाते, प्रदीप गजानन भगत, अनिल सुरेश खताळ, दत्तात्रय ज्ञानदेव कवर, लक्ष्मण दिलीप पाटील, दीपक नारायण आहेर, भिमराव दशरथ चव्हाण, शशिकांत विष्णू यादव, शंकर भिकाजी शिंदे, संतोष गोणबा गाढवे, सुभाष बळवंत यादव, गौतम शनिचर भारती यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सोनल गुंजाळ, संभाजी शिवाजी बर्गे, सुनील धोंडे, मयूर मगर, अंकुश संकपाळ या लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments