प्रतिनिधी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १९५९ पासूनचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार, आणि आजवर लाखो आदिवासी मुलामुलींना गेली सहा दशके शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे १९६२ पासून आजवर अध्यक्ष, कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले हे कळवताना अतीव दुःख होत आहे.
गेले १० दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खासगी इस्पितळात आय.सी.यू. मध्ये होते. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्यामागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे.
कॉम्रेड लहानू कोम यांच्या असामान्य, लढाऊ आणि एकनिष्ठ जीवनकार्याचा परिचय देणारा लेख लवकरच प्रसृत केला जाईल.
*कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार, दिनांक २९ मे रोजी दुपारी १२ वाजता पालघर जिल्ह्यात तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून निघेल.*
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक नेते व कार्यकर्ते, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे अनेक नेते, आणि इतर अनेक मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी होतील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे-पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील हजारो कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी होतील.