मुंबई : श्री संत रोहिदास सेवा मंडळ काळा किल्ला धारावी व श्री पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे प्रस्थान शनिवार, ७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून होणार आहे.
ही दिंडी १९७८ साली संस्थापक गुरुवर्य ह.भ.प. पांडुरंग कारंडे महाराज कराडकर यांनी सुरू केली होती आणि यंदा या दिंडीच्या ४८ व्या वर्षाचे औचित्य साधण्यात येत आहे.
प्रस्थान सोहळ्याला मुंबईतील विविध भागांतून शेकडो भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसेच, अनेक मान्यवरांची उपस्थितीही यावेळी असते. दिंडी मुंबई ते पंढरपूर असा पायी प्रवास करत वारकरी परंपरेचे दर्शन घडवत असते.
मुंबईतील सर्व भाविक भक्तांना या पहिल्या दिंडीच्या प्रस्थानावेळी उपस्थित राहण्याचे व दिंडी सोहळ्याचा आध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन श्री पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.